उन्हाळ्याची सुट्टी म्हंटली की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या सुट्ट्यांचा कालावधी. यावेळी कोणी आपल्या गावी तर कोणी विविध पर्यटन स्थळे गाठतात. यंदा देखील मार्च महिन्यापासून विविध पर्यटन स्थळांच्या बुकिंग सुरु झाल्या असून सद्यस्थितीत जवळपास सर्वच ठिकाणे फुल झाल्याचे दिसून येत आहे. यंदा सिमला-कुलू मनाली, उत्तराखंड, काश्मीर, लेहसारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये सर्वाधिक पर्यटक जात आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक यास्थळी जात असल्याने विमान तिकिटांपासून ते हॉटेल, स्थानिक प्रवास भाडे सर्वच दर गगनाला भिडले आहेत. दर दुप्पट झाल्याने परिणामी पर्यटकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
उन्हाळ्याची सुट्टी म्हंटलं की पर्यटक अलीकडे सहा महिने आधीच नियोजन करतात. पर्यटकांच्या बदलेल्या मानसिकतेमुळे ट्रॅव्हल कंपन्यांनीही त्यांच्या सहलींची पॅकेज लवकर जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. लवकर नोंदणी करणाऱ्यांना सहल कंपन्या, विमान कंपन्यांकडून विशेष सवलतीही मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने पर्यटकांकडून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच लांब पल्ल्याच्या सहलींचे बुकिंग करण्यात येत आहे. 'इस बार कुछ बडा हो जाये' ही पर्यटकांची मानसिकता आहे. त्यामुळे छोट्या सुट्टीत मोठा पल्ला गाठण्याची स्वप्न पर्यटक बघत आहेत. परदेशी सहलींचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान, सर्वाधिक पसंती असणाऱ्या मुंबईहून श्रीनगरसाठी देखील विमान तिकिटासाठी १४ ते १९ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. तर मुंबई-जम्मू तिकीटही १२ ते १४ हजार रुपयांच्या घरात आहे. सर्वाधिक दर मुंबई ते लेह तिकिटाचा असून, यासाठी २५ हजार रुपये खर्च येत असल्याचे टुर आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
विमानाची वाढती क्रेझ
पर्यटक गेल्या काही वर्षांत अधिक जागरूक झाले आहेत. रेल्वे प्रवासासाठी तिकीट दर कमी लागत असला तरी वेळेच्या बचतीसाठी लवकर बुकिंग केल्यास विमान प्रवास परवडत असल्याने दोन ते ३ महिने आधीच पर्यटकांकडून विमान तिकीट काढण्यात येत आहे. मुलांना हटके अनुभव मिळावा यासाठी पर्यटकांमध्ये विमान प्रवासाची क्रेझ आहे. तर काही पर्यटक एक वेळ रेल्वे आणि एक वेळ विमान प्रवास असे नियोजन करत आहेत.
सध्याचे विमान तिकीट दर (इतरवेळेपेक्षा दुप्पट दर)
मुंबई - दिल्ली - १५ हजार ते १७ हजार
मुंबई - चंदीगड - १२ हजार ते १४ हजार
मुंबई - श्रीनगर - १५ हजार ते १८ हजार
मुंबई - जम्मू - १३ हजार ते १४ हजार
मुंबई - डेहरादून - १३ हजार ते १४ हजार