मुंबई : आतापर्यंत धनादेश वठायला दोन ते तीन दिवस लागत होते. मात्र, आजपासून धनादेश वठण्याची प्रक्रिया काही तासात पूर्ण होणार आहे. कारण भारतातील धनादेश (चेक) क्लिअरिंग प्रणाली अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना मोठा फायदा होईल. यामुळे बँकिंग क्षेत्रात आणखी मोठे बदल होणार आहेत.
धनादेश वठण्याची आतापर्यंतची प्रक्रिया बॅच-आधारित होती. आता ही प्रणाली सतत चालणाऱ्या क्लिअरिंग व रिअल-टाइम सेटलमेंटमध्ये रूपांतरित केली जाणार आहे. या बदलामुळे धनादेशाचे पैसे नेहमीप्रमाणे १-२ कामकाजाच्या दिवसांत न येता काही तासांतच तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतील.
भारतीय रिझर्व्ह बँकेने ३ ऑक्टोबर रोजी याची चाचणी घेतली. कारण त्यामुळे या प्रणालीच्या अधिकृत अंमलबजावणीसाठी बँका तयार राहतील.
नवीन प्रणालीत धनादेश हे निश्चित तुकडीत प्रक्रिया केले जाणार नाहीत. बँका सकाळी १० ते दुपारी ४ या सत्रात सतत चेक स्कॅन करून पाठवतील. प्रत्येक चेक जवळपास रिअल-टाइममध्ये सेटल होईल. ज्यामुळे आताचा टी+१ दिवसांचे ‘क्लिअरिंग सायकल’ फक्त काही तासांवर येऊन थांबेल. आरबीआयने बँकांना सांगितले की, त्यांनी सत्रादरम्यान धनादेशाबाबत सकारात्मक (मान्य) किंवा नकारात्मक (अस्वीकृत) दुजोरा द्यावा. जर समोरच्या बँकेकडून प्रतिसाद आला नाही, तर तो धनादेश मान्य झाल्याप्रमाणे समजला जाईल आणि सेटलमेंटमध्ये समाविष्ट केला जाईल.
सध्या, धनादेश मंजूर होण्यासाठी १-२ दिवस लागतात. आता सतत ‘क्लिअरिंग’मुळे निधी काही तासांत खात्यांमध्ये पोहोचू शकतो. ही क्लिअरिंगची गती संपूर्ण देशभर समान राहणार आहे.
बँका करणार पटापट ‘सेटलमेंट’
सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जमा केलेले चेक ताबडतोब स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसकडे पाठवले जातील. सकाळी ११ वाजल्यापासून बँका पटापट पैशाची सेटलमेंट करतील. एकदा सेटलमेंट पूर्ण झाल्यावर, सादर करणारी बँक ग्राहकांना निधी एका तासात त्यांच्या खात्यात देईल.