नवी दिल्ली : तापमानवाढीच्या वातावरणात ढग एकत्रित येण्याच्या आकृतीबंधांचा अभ्यास केला असता असे आढळून आले आहे की, वाढत्या उष्म्यामुळे तुफान पर्जन्यवृष्टीचे प्रकार अधिक गंभीर होतील, असे शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे.
उष्णकटिबंध आणि विषुववृत्त यावर प्रकाशझोत टाकताना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी ऑस्ट्रिया (आयएसटीए) आणि मॅक्स प्लान्क-इन्स्टिट्यूट फॉर मीटरॉलॉजी (एमपीआय-एम) येथील शास्त्रज्ञांनी ढग आणि वादळ एकत्र आल्याचा प्रभाव तुफान पर्जन्यवृष्टीवर कसा होईल याचा अभ्यास करण्यासाठी हवामानाच्या प्रारूपाचा वापर केला. तापमानवाढीच्या वातावरणामुळे उष्णकटिबंधात तुफान पर्जन्यवृष्टी होण्याचे प्रकार घडतील, असे शास्त्रज्ञांना आढळून आले. ढग ज्या वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात तेव्हा पर्जन्यवृष्टी दीर्घकाळ होते हे आपल्याला दिसून येते, त्यामुळे पावसाच्या एकूण प्रमाणात वाढ होईल, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.