नवी दिल्ली : मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अखेर भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय पथक त्याला अमेरिकन ‘गल्फस्ट्रीम जी-५५०’ या विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर मूळचा पाकिस्तान आणि नंतर कॅनडाचा नागरिक असलेल्या तहव्वूर राणा याला थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेण्यात आले. यावेळी ‘एनआयए’ मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
‘एनआयए’ आणि ‘रॉ’ टीमच्या सुरक्षेत राणा गुरुवारी दुपारी एका खास विमानाने दिल्ली विमानतळावर उतरला. नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्याला ‘एनआयए’ टीमने अधिकृतपणे ताब्यात घेतले. यानंतर राणाला बुलेटप्रूफ कारमधून ‘एनआयए’ मुख्यालयात नेण्यात आले. त्याला आता पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे, मात्र त्याआधी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. राणाला दिल्लीच्या तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. तुरुंग प्रशासनाने यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे.
२००८च्या मुंबई हल्ल्यातील सहभागप्रकरणी तहव्वूर हुसैन राणा अमेरिकेत शिक्षा भोगत होता. मे २०२३ मध्ये तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील कोर्टाने मंजुरी दिली होती. या निर्णयाला राणाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मात्र, ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. तहव्वूर राणा हा त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासह डेन्मार्कमध्ये मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली २०१३ मध्ये दोषी आढळला होता. अमेरिकन कोर्टाने त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर ‘एनआयए’ने एक निवेदन जाहीर केले आहे. “कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने १६ मे २०२३ रोजी राणाच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले. यानंतर राणाने नाइन्थ सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये याला आव्हान दिले होते. परंतु त्याचे आव्हान फेटाळण्यात आले होते. त्यानंतर त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातही अनेक याचिका दाखल केल्या होत्या. परंतु या याचिकादेखील फेटाळण्यात आल्या होत्या. अमेरिकेच्या न्याय विभाग आणि अमेरिकेच्या स्काय मार्शलच्या मदतीने, ‘एनआयए’ने भारतीय गुप्तचर संस्था आणि ‘एनएसजी’ यांच्या सहकार्याने राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पार पाडली आहे,” असे त्यात म्हटले आहे.
पाकिस्तानने हात झटकले
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर पाकिस्तानने आपले हात झटकले आहेत. “तहव्वूर राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे तो कॅनेडियन नागरिक असल्याचे अगदी स्पष्ट आहे,” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था
तहव्वूर राणा याला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यापूर्वी, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव माध्यम प्रतिनिधी आणि सामान्य लोकांना न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढले. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान आणि पियूष सचदेवा यांच्यावर राणाविरोधातील खटल्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष ‘एनआयए’ न्यायाधीश चंदरजित सिंग यांच्यासमोर राणाला हजर केले जाणार आहे.