काटकसर करा! सरकारी बँका, विमा कंपन्यांना अर्थ मंत्रालयाचे आदेश 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

काटकसर करा! सरकारी बँका, विमा कंपन्यांना अर्थ मंत्रालयाचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर, अर्थ मंत्रालयाने सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांना काटकसरीचे उपाय अवलंबण्याचे आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे आवाहन केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर, अर्थ मंत्रालयाने सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांना काटकसरीचे उपाय अवलंबण्याचे आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात, पंतप्रधानांनी नागरिकांना इंधनाचा न्याय्य वापर करणे, सोने खरेदी आणि परदेश प्रवास पुढे ढकलणे यासारख्या उपाययोजनांचे आवाहन केले होते, जेणेकरून अर्थव्यवस्था मजबूत करता येईल. केंद्र सरकार लोकांना पश्चिम आशियातील संघर्षाच्या प्रतिकूल प्रभावापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, यावर भर दिला होता.

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, वित्तीय संस्थांना जारी केलेल्या परिपत्रकात प्रवासावरील खर्च कमी करण्याचे आणि इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

काटकसरीचे उपाय तातडीने लागू केले जातील, असे वित्तीय सेवा विभागाने या परिपत्रकात म्हटले आहे. विशेष गरज असल्याशिवाय सर्व बैठका, आढावा आणि सल्लामसलत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच केली जावी, असे यात नमूद करण्यात आले आहे. बँका आणि वित्तीय संस्थांचे अध्यक्ष, एमडी, सीईओ आणि पूर्णवेळ संचालकांचे परदेश प्रवास विहित मर्यादेपेक्षा कमी ठेवले जावेत आणि अशा कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली जावी, असेही म्हटले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात परिपत्रकात म्हटले आहे कि, सर्व संस्थांनी त्यांच्याद्वारे भाड्याने घेतलेल्या पेट्रोल आणि डिझेल कार शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक कारने बदलण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यमान वाहनांचा ताफा टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित केला जावा, असे यात नमूद केले आहे.

उद्योगांना उत्पादन वाढवण्याचे आवाहन

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी उद्योगांना अशा वस्तू शोधण्याचे आवाहन केले ज्यांचे भारतात उत्पादन केले जाऊ शकते, जेणेकरून त्या उत्पादनांवरील आयातीचे अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. त्यांनी निर्यात वाढवण्याचा आणि वस्तू आयात करण्याऐवजी भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी करण्याचा सल्लाही दिला. देशांर्गत व्यापाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, कोणत्या वस्तूंची आयात केली जात आहे यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे, भारतात कोणत्या गोष्टींचे उत्पादन केले जाऊ शकते, यामध्येही तुम्हाला संधी दिसून येतील. गोयल यांनी भागधारकांना वाणिज्य मंत्रालयाच्या व्यापार पोर्टलद्वारे आयातीच्या ट्रेंडचा अभ्यास करण्याचे आणि देशांर्गत उत्पादन तसेच आयात पर्यायीकरणासाठी संधी शोधण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सरकारी विभागाचा पुढाकार

पंतप्रधानांनी १० मे रोजी इंधनाचा योग्य वापर करणे, सोने खरेदी आणि परदेश प्रवास पुढे ढकलणे यासह इतर उपाययोजनांचे आवाहन केले होते. पश्चिम आशियातील संकटामुळे परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करणे, शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा वापरणे, कार पूलिंग करणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, पार्सल वाहतुकीसाठी रेल्वे सेवांचा वापर करणे आणि वर्क फ्रॉम होम करणे यांसारखे सल्ले दिले होते. परकीय चलन वाचवण्याच्या गरजेवर भर देत मोदी यांनी सोने खरेदी आणि परदेश प्रवास एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर सरकारी विभाग आणि राज्य सरकारांनी काटकसरीच्या उपायाचे आवाहन केले.

मेट्रोमुळे मीरा, भाईंदर लोकल प्रवाशांमध्ये मोठी घट; मीरा रोडची गर्दी ४० लाखांवरून २८ लाखांवर

सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटींचा निधी मंजूर; तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीत निर्णय

शिंदे सेना-भाजपमध्ये ठाण्यात संघर्ष पेटला; पक्षीय वाद नसल्याचा शिंदे सेनेचा दावा

नवी मुंबईत ९२५ एकरांवर लॉजिस्टिक पार्क उभारणार; सिडकोकडून पहिल्या टप्प्यासाठी निविदा जाहीर

NEET Paper Leak: 'आरसीसी'च्या मोटेगावकरला ठोकल्या बेड्या; ९ दिवसांची सीबीआय कोठडी