राष्ट्रीय

'इस्तंबूल काँग्रेस सेंटर' ला सांगितले काँग्रेसचे तुर्कीमधील ऑफिस; अमित मालवीय आणि अर्णब गोस्वामीविरोधात बंगळुरूमध्ये FIR

तुर्कीतील ‘इस्तंबूल काँग्रेस सेंटर’ ही इमारत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची असल्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Krantee V. Kale

तुर्कीतील ‘इस्तंबूल काँग्रेस सेंटर’ ही इमारत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची असल्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

१५ मे रोजी रिपब्लिक टीव्हीच्या ‘डिबेट विथ अर्णब’ कार्यक्रमात इमारतीचा फोटो दाखवत ती काँग्रेसचे तुर्कीतील कार्यालय असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर १७ मे रोजी मालवीय यांनी तोच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच, शत्रूचा मित्रही शत्रूच असतो अशी टीकाही केली होती. मात्र, Alt News च्या पडताळणीमध्ये ही इमारत म्हणजे इस्तंबूल महानगरपालिकेच्या मालकीचे कन्व्हेन्शन सेंटर असून तिचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही, हे स्पष्ट झाले आहे.

दंगलीसाठी चिथावणी, जाणूनबुजून अपमान आणि शांतता भंगचा प्रयत्न

या खोट्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय युवा काँग्रेसच्या कायदेशीर विभागाचे प्रमुख श्रीकांत स्वरूप बी.एन. यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे, जाणूनबुजून अपमान करणे, आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे, या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हटलंय तक्रारीत?

तक्रारीत म्हटले आहे, की सदर दावा “भारतीय जनतेची फसवणूक, एक प्रमुख राजकीय संस्थेची बदनामी, राष्ट्रवादी भावना भडकवणे, सार्वजनिक असंतोषाला चालना देणे, आणि राष्ट्रीय सुरक्षा व लोकशाही संस्थांवर आघात करण्याच्या निःसंशय गुन्हेगारी हेतूने करण्यात आला होता.” भारतीय व पाकिस्तानी संबंध ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तणावपूर्ण झालेले असतानाच, तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. अशा संवेदनशील काळात हा दावा करण्यात आल्याचेही युवा काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

रिपब्लिक टीव्हीची माफी, काँग्रेस म्हणाली - माफी पुरेशी नाही

रिपब्लिक टीव्हीने मंगळवारी डिजिटल डेस्कवरील व्हिडिओ एडिटरने "तांत्रिक चूक" केल्याचे मान्य करत खेद व्यक्त केला. पण काँग्रेसने यावर संतप्त प्रतिक्रिया देत "फक्त माफी पुरेशी नाही", असे स्पष्ट केले.

२०१९ मध्ये काँग्रेसने इस्तंबूलमध्ये परदेशी कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी मोहम्मद युसुफ खान यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, तसेच Indian Overseas Congress च्या वेबसाइटवर तुर्कीचा उल्लेखही नाही, असेही Alt News ने नमूद केले आहे.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल