नवी दिल्ली: देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून व्हेइकल टू व्हेइकल (व्ही २ व्ही) संवाद तंत्रज्ञान आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहनांना एकमेकांशी थेट संवाद साधता येणार असून, अपघात होण्याआधीच चालकांना धोक्याचा इशारा मिळणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला सरकारकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अशा मदत करणाऱ्या 'राहवीर' असे नागरिकांना संबोधले जाणार आहे.
व्ही २ व्ही संवाद प्रणालीमुळे आसपासच्या वाहनांचा वेग, स्थान, ब्रेकिंग, अचानक दिसणारे अडथळे किंवा ब्लाइंड स्पॉटवर वाहन चालकांना रिअल टाइम अलर्ट मिळेल. त्यामुळे चालक वेळीच योग्य निर्णय घेऊ शकतील आणि अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. या उद्देशाने दूरसंचार विभागासोबत संयुक्त कार्यदल स्थापन करण्यात आला असून, व्ही २ व्ही संवादासाठी ५.८७५ ते ५.९०५ जीएचझेड दरम्यानचा ३० एमएचझेड स्पेक्ट्रम वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गडकरी यांनी घोषणा करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार रस्ते अपघात पीडितांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करणार आहेत. या योजनेंतर्गत अपघातग्रस्तांना किमान सात दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. कोणत्याही रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला सरकारकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अशा मदत करणाऱ्या नागरिकांना 'राहवीर' असे संबोधले जाईल. ही योजना उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि चंडीगडसह काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून यशस्वीपणे राबवण्यात आली आहे.
सुधारणा, रस्ते सुरक्षेत कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक करणे, नागरिक सेवांचा दर्जा उंचावणे, व्यवसाय सुलभता वाढवणे आणि जागतिक मानकांशी सुसंगत नियम तयार करणे अशी आहेत. दिल्लीत झालेल्या परिवहन विकास परिषदेच्या ४३व्या बैठकीत बस व प्रवासी वाहनांसाठी सुधारित सुरक्षा मानके, तसेच वाहतूक नियमभंगासाठी डिमेरिट व मेरिट पॉइंट सिस्टीम लागू करण्यावरही चर्चा झाली.
अपघातांची गंभीर स्थिती
गडकरी यांनी सांगितले की, देशात दरवर्षी सुमारे ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये जवळपास १.८ लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील सुमारे ६६ टक्के मृत्यू १८ ते ३४ वयोगटातील तरुणांचे आहेत. सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोटार वाहन अधिनियमात ६१ सुधारणा सुचवणार आहे.