नवी दिल्ली : अन्न सुरक्षा नियामक (FSSAI) ने एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स आणि लालजी गोधू अँड कंपनीच्या हिंग पावडरच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तपासणीत या कंपन्यांच्या हिंगचे नमुने निकृष्ट दर्जाचे तसेच चुकीचे लेबलिंग केलेले आढळल्याने शनिवारी (दि. २९) ही कारवाई करण्यात आली. निर्धारित निकषांपेक्षा कमी अल्कोहोलिक अर्क आणि अधिक स्टार्च आढळल्याने संबंधित उत्पादनांविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
हिंग पावडरचे नमुने निकृष्ट दर्जाचे
पीटीआयच्या माहितीनुसार, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) सोशल मीडिया पोस्टद्वारे या कारवाईची माहिती दिली. प्राथमिक अन्न प्रयोगशाळेतील अन्न विश्लेषकाने कम्पाउंडेड असाफोएटिडा अर्थात हिंग पावडरच्या नमुन्यांची तपासणी केली.
या तपासणीत नमुने 'चुकीचे लेबलिंग केलेले आणि निकृष्ट दर्जाचे' असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित कंपन्यांविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले.
अल्कोहोलिक अर्काचे प्रमाण शून्य टक्के
FSSAIच्या माहितीनुसार, एव्हरेस्टच्या हिंग पावडरमधील अल्कोहोलमध्ये विरघळणाऱ्या अर्काचे प्रमाण निर्धारित किमान ५ टक्क्यांच्या तुलनेत ० टक्के आढळले. त्यामुळे हे उत्पादन FSS (अन्न उत्पादने आणि अन्न मिश्रित पदार्थ) नियमावली, २०११ मधील तरतुदींशी सुसंगत नसल्याचे आढळले.
याशिवाय, यलो हिंग पावडर आणि ब्लॅक हिंग पावडरच्या नमुन्यांमध्ये अल्कोहोलिक अर्काचे प्रमाण अनुक्रमे ३.२९ टक्के आणि ४.४ टक्के आढळले. हे प्रमाणही निर्धारित निकषांपेक्षा कमी असल्याचे FSSAI ने म्हटले आहे.
कंपनीला कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश
निकृष्ट दर्जाच्या कम्पाउंडेड हिंग किंवा असाफोएटिडाची विक्री करण्याची प्रथा थांबवण्यासाठी आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश FSSAI ने एव्हरेस्टला दिले आहेत.
FSS कायदा, २००६ अंतर्गत मिळालेल्या परवान्यानुसार केवळ निर्धारित दर्जाची उत्पादनेच विकली जातील, याची खात्री करण्यासही कंपनीला सांगण्यात आले आहे. त्रुटी दूर करण्यात अपयश आल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
लालजी गोधूच्या हिंगमध्येही त्रुटी
लालजी गोधू अँड कंपनीच्या हिंग पावडरचे नमुनेही निकृष्ट आणि भेसळयुक्त आढळल्याचे FSSAIने सांगितले. त्यामुळे कंपनीला हिंग पावडरची विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
कम्पाउंडेड हिंग किंवा कम्पाउंडेड असाफोएटिडाचे पावडर आणि खडा स्वरूपातील नमुने निर्धारित निकषांनुसार नसल्याचे तपासणीत आढळले. त्यासोबतच हिंगच्या नमुन्यांवर चुकीचे लेबलिंग केल्याचेही समोर आले.
कच्च्या हिंगातील स्टार्चचे प्रमाणही अधिक
कम्पाउंडेड हिंग तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या हिंगाच्या विविध प्रकारांच्या नमुन्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळले. नियमांनुसार हिंगामधील स्टार्चचे प्रमाण वजनाच्या १ टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये.
या प्रकरणातही FSSAI ने लालजी गोधूला गैरप्रथा थांबवण्यासाठी आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
निर्धारित दर्जाचीच उत्पादने विकण्याचे निर्देश
FSSAIने कंपनीला FSS कायद्यानुसार निर्धारित दर्जाचीच उत्पादने तयार आणि विक्री केली जातील, यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. तसेच या संदर्भातील कृती आराखडा आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.