ग्राहकांकडून मुदत संपलेले, खराब आणि असुरक्षित अन्नपदार्थ वितरित केल्याच्या तक्रारींनंतर स्विगी इन्स्टामार्ट अडचणीत सापडले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) कंपनीला ९ नोटिसा बजावत सविस्तर स्पष्टीकरण मागवले आहे. अन्न सुरक्षा नियमांचे कथित उल्लंघन, अयोग्य साठवणूक, परवाना नियमांतील त्रुटी आणि तक्रार निवारणातील हलगर्जीपणाबाबतही FSSAI ने आक्षेप नोंदवले आहेत.
खराब अन्नपदार्थ पुरवल्याचा आरोप
FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ग्राहकांनी स्विगी इन्स्टामार्टमार्फत कालबाह्य, सडलेले किंवा दूषित अन्नपदार्थ मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींमधून अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत विविध नियमांचे संभाव्य उल्लंघन झाल्याचे दिसून येत असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे.
परवाना नियमांबाबतही आक्षेप
तक्रारींमध्ये नोईस एग्ज या उत्पादनाची FSSAI च्या वैध परवाना श्रेणीत नोंद नसतानाही विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अन्न व्यवसाय चालकाने आवश्यक परवाना दुरुस्ती होईपर्यंत अशा उत्पादनांची विक्री तातडीने थांबवावी, असे निर्देश FSSAI ने दिले आहेत.
मुदत संपलेली प्रोटीन पावडर आणि स्नॅक्स वितरित केल्याची तक्रार
नोटिसांमध्ये हेल्थिफाय १००% व्हे प्रोटीन (१ किलो) आणि नोईस होमस्टाईल मद्रास मिक्स्चर विथ पीनट्स ही उत्पादने कालबाह्य झाल्यानंतर ग्राहकांना वितरित केल्याच्या तक्रारींचाही उल्लेख करण्यात आला आहे.
खराब अंडी आणि सडलेले अन्नपदार्थ
अक्षयकल्पा ऑर्गेनिक एग्ज ही अंडी खराब अवस्थेत वितरित झाल्याची तक्रारही FSSAI कडे करण्यात आली आहे. अंड्यांना दुर्गंधी येत होती आणि त्यामध्ये खराब झाल्याची चिन्हे असल्याचे ग्राहकांनी नमूद केले आहे. वारंवार तक्रारी करूनही योग्य ती सुधारात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय 'कक्के दा पराठा' हे उत्पादनही खराब आणि दुर्गंधीयुक्त अवस्थेत वितरित करण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शिशू आहाराबाबतही गंभीर चिंता
एका शिशू आहार उत्पादनाची अयोग्य साठवणूक झाल्यामुळे ते दूषित अवस्थेत ग्राहकाला मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोषपूर्ण उत्पादन परत केल्यानंतरही ग्राहकाला तेच उत्पादन पुन्हा देण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
दुग्धजन्य पदार्थ आणि पॅकेज्ड अन्नाबाबतही तक्रारी
दूषित अंडी, दुग्धजन्य पदार्थ तसेच खराब झालेल्या पॅकेज्ड अन्नपदार्थांच्या वितरणासंदर्भातील अनेक तक्रारींचाही FSSAI ने आपल्या नोटिसांमध्ये उल्लेख केला आहे.
परवाना क्रमांक आणि नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी
FSSAI ने काही अन्न व्यवसाय संस्थांकडून चुकीचे, अवैध किंवा अस्तित्वात नसलेले परवाना क्रमांक वापरले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच काही विक्रेते प्राधिकरणाकडे नोंदणीकृत नावाऐवजी वेगळ्या नावाने व्यवसाय करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
याशिवाय विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया, अन्नपदार्थांचा मागोवा घेण्याची व्यवस्था, गुणवत्ता तपासणी आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीतही संभाव्य त्रुटी असल्याचे FSSAI ने नमूद केले आहे.
तक्रार निवारण यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह
काही ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचेही नियामकाने म्हटले आहे. काही प्रकरणांमध्ये केवळ पैसे परत करण्यात आले, मात्र अन्न सुरक्षेशी संबंधित मूळ समस्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सविस्तर स्पष्टीकरण मागवले
FSSAI ने संबंधित अन्न व्यवसाय चालकाला सर्व कथित उल्लंघनांबाबत आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, साठा व्यवस्थापन, साठवणुकीची पद्धत, स्वच्छता, अन्न सुरक्षा निरीक्षण आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीबाबतची माहितीही मागवण्यात आली आहे.
तसेच सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना (CAPA), तक्रार निवारण यंत्रणा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा
निर्धारित मुदतीत आवश्यक स्पष्टीकरण आणि नियमपालन अहवाल सादर न केल्यास अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा FSSAI ने स्विगी इन्स्टामार्टला दिला आहे.