सरकारी नोकरीसाठी मुलीनेच घेतला आईचा जीव! ७ लाखांची सुपारी देऊन रचला संपवण्याचा कट X
राष्ट्रीय

सरकारी नोकरीसाठी मुलीनेच घेतला आईचा जीव! ७ लाखांची सुपारी देऊन रचला संपवण्याचा कट

जयपूरमध्ये २३ वर्षीय मुलीने सरकारी नोकरी आणि मालमत्तेच्या लालसेपोटी आईच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mayuri Gawade

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी २३ वर्षीय मुलीनेच आपल्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हत्येसाठी तब्बल ७ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातून हा पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले.

मृत महिलेचे नाव नीरज शर्मा (४५) असून त्या जयपूरमधील न्यायालयात कनिष्ठ लिपिक (एलडीसी) म्हणून कार्यरत होत्या. ३ जुलै रोजी प्रतापनगर परिसरात त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताचा बनाव करून हत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून नीरज शर्मा घरी परतत असताना भरधाव स्कॉर्पिओ गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या जवळपास १०० फूट दूर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

सीसीटीव्हीतून उघड झाला कट

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा अपघात नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. मृत महिलेची मुलगी आयुषी शर्मा, तिचे काका मोहन स्वरूप आणि इतर आरोपींना अटक केली आहे. तर या कटातील प्रमुख सूत्रधार मानला जाणारा आयुषीचा चुलत भाऊ बलराम उर्फ रवी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

सरकारी नोकरी आणि मालमत्तेचा हव्यास

पोलिसांनी सांगितले की, नीरज शर्मा यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर मिळालेली सरकारी नोकरी नीरज शर्मा यांनी स्वीकारली. मात्र, ही नोकरी स्वतःला मिळावी, अशी आयुषीची इच्छा होती. याशिवाय मागील दोन-तीन वर्षांपासून आई-मुलीमध्ये मालमत्तेवरूनही वाद सुरू होता.

याच कारणातून आयुषीने तिच्या काका आणि चुलत भावाच्या मदतीने भरतपूर येथील हेमंत शर्मा याला तब्बल ७ लाख रुपयांची सुपारी देऊन आईची हत्या घडवून आणल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

महिनाभर पाठलाग करून रचला कट

तपासात आरोपींनी महिनाभर नीरज शर्मा यांच्या हालचालींवर पाळत ठेवल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला त्यांनी भाड्याने घेतलेल्या थार वाहनातून रेकी केली. त्यानंतर खुनाच्या दिवशी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत स्कॉर्पिओने धडक देऊन हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

भावाने केला होता छळाचा आरोप

नीरज शर्मा यांचे भाऊ राकेश शर्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, आयुषी आणि नातेवाईकांकडून मालमत्तेसाठी नीरज शर्मा यांचा छळ केला जात होता. तसेच त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या, असा आरोप केला आहे.

पोलिस या संपूर्ण कटाचा अधिक तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पीएफचे व्याज जमा होण्यास अखेर सुरुवात; पुढील आठवड्यापर्यंत सभासदांना पाहता येणार अपडेट

माऊलींच्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

Mira Road : पाऊस ओसरला, तरी डोकेदुखी कायम! आता साथीच्या आजारांचे संकट गडद; मुसळधार पावसानंतर संसर्गाची भीती

पाताळगंगेत HPCL चे ३,००० गॅस सिलेंडर वाहून गेले; फुकटात टाक्या नेण्यासाठी नागरिकांची गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचं आवाहन

ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला आठ दिवसांची मुदत; वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली