नवसारी : महिलांच्या सुरक्षेला आपल्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
भारतीय न्याय संहितेत महिलांच्या सुरक्षेसाठीच्या कायदेशीर तरतुदी अधिक कडक करण्यात आल्या असून तक्रार दाखल करण्याची पद्धत अधिक सोपी करण्यात आली आहे आणि न्याय वेगाने मिळेल याचीही खातरजमा करण्यात आली आहे, असेही मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारी जिल्ह्यातील वानसी बोरसी गावात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते.
देशाची झपाट्याने प्रगती व्हावी यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या मार्गावर देश वाटचाल करीत आहे. जेव्हा एखादी मुलगी घरी उशिरा येते तेव्हा तिचे पालक प्रश्न विचारतात, मात्र जेव्हा मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा पालक प्रश्न विचारत नाहीत, त्यांनी मुलांनाही प्रश्न विचारला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या दशकात आम्ही महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी आम्ही कायद्यात बदल करून फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे, महिलांना जलद न्याय मिळण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली आहेत. देशात जवळपास ८०० न्यायालयांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी बहुसंख्य न्यायालये सुरू झाली आहेत, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी महिला पोलिसांवर
नरेंद्र मोदी यांच्या लखपतीदीदी कार्यक्रमासाठी गुजरातमधील गावात दीड लाखांहून अधिक महिला उपस्थित होत्या, तर कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी सुरक्षेची जबाबदारी २५०० महिला पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.