Gujarat Monsoon Fury : गुजरातमध्ये पावसाचा 'हाहाकार'; Video (Photo-X)
राष्ट्रीय

Gujarat Monsoon Fury : गुजरातमध्ये पावसाचा 'हाहाकार'; Video

गुजरातमध्ये मुसळधार पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या अत्यंत मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Swapnil S

अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या अत्यंत मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारतीय तटरक्षक दलाने मोठ्या प्रमाणावर मदत व बचाव कार्य सुरू केले आहे.

राज्यभरातून आतापर्यंत ४०,५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून २,६३७ जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण गुजरातमधील सर्वाधिक प्रभावित वलसाडच्या उंबरगाव तालुक्यात गेल्या ४८ तासांत तब्बल १,३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय पाटण, वाव-थराड, आणि अहमदाबाद शहरातही मुसळधार पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पथके तैनात; हेलिकॉप्टरने बचाव

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ४९ पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये ओडिशावरून एअरलिफ्ट करून आणलेल्या एनडीआरएफच्या टीम्ससह एसडीआरएफ, लष्कर आणि कोस्ट गार्डच्या जवानांचा समावेश आहे.

नवसारीतील बिलिमोरा आणि गणदेवी तालुक्यात पुराचे पाणी अत्यंत खोल असल्याने कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरचा वापर करून छतांवर अडकलेल्या ६० शेतकरी आणि मीठ कामगारांना सुरक्षितपणे एअरलिफ्ट करण्यात आले. बनासकांठा, वलसाड, अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये लष्कराच्या विविध तुकड्या बचावकार्य करत आहेत. अहमदाबादच्या बोपाल भागातून लष्कराने सुमारे १०० जणांची सुटका केली.

मुख्यमंत्र्यांची पाहणी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमधील पूरग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी केली. पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने ४० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शनिवारीही सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

हवामान खात्याचा 'रेड अलर्ट'

भारतीय हवामान विभागाने शनिवारी खेडा, गांधीनगर, सुरेंद्रनगर, अरवली, साबरकांठा आणि मेहसाणा जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तर अहमदाबाद, राजकोट, वडोदरा, भरुचसह अनेक जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राजीनामाच हवा! प्रधान यांच्या हकालपट्टीवर CJP ठाम, आज निर्णय होणार?

पेपरफुटीतील दोषींना आता १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सरकार करणार नवा कायदा

लाठीमाराबाबत सोमवारी ‘सर्वोच्च’ सुनावणी

Mumbai : शिवाजी पार्कवर एकवटली तरुणाई; ही तिरंगा विरुद्ध हुकूमशाही अशी लढाई, उद्धव ठाकरेंनी भाजपला ललकारले

Mumbai : सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींचा ऐवज लंपास; एका आरोपीला अटक