राष्ट्रीय

ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी फेटाळली, हिंदू पक्षकारांना न्यायालयाचा मोठा झटका

वाराणसी न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावल्याने हिंदू पक्षकारांना मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात ११ ऑक्टोबरला न्यायालय निर्णय देणार होते

प्रतिनिधी

ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिरप्रकरणात वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या वजुखान्यात असलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी करण्याची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे हे शिवलिंग किती पुरातन आहे, किती वर्षांपूर्वीचे आहे, यासाठी चाचणी करता येणार नाही.

हिंदू पक्षकारांकडून मशिदीतील शिवलिंग म्हणजे प्राचीन काळातील विश्वेश्वर महादेव असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी हिंदू पक्षकारांनी कार्बन डेटिंगची मागणी केली होती; परंतु ज्ञानवापी मशिदीकडून या मागणीला जोरदार विरोध करण्यात आला. वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीची बाजू उचलून धरत शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

वाराणसी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पाच महिलांनी श‌ृंगार गौरीचे पूजन करण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले; परंतु सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने मुस्लीम पक्षकारांना झटका बसला होता. या सगळ्यामुळे कार्बन डेटिंगच्या मागणीला मंजुरी मिळेल, अशी हिंदू पक्षकारांची अपेक्षा होती; मात्र वाराणसी न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावल्याने हिंदू पक्षकारांना मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात ११ ऑक्टोबरला न्यायालय निर्णय देणार होते, मात्र न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

कार्बन डेटिंग म्हणजे काय?

एखाद्या वस्तूचे वय आणि काळ ठरवण्याच्या पद्धतीला कार्बन डेटिंग म्हणतात. कार्बन डेटिंगला ‘रेडिओ कार्बन डेटिंग’ असेही म्हणतात. कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये सी-१४ नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचे अणू वस्तुमान १४ इतके असते. हा कार्बन रेडिओ ॲक्टिव्ह असतो. जसजशी सदर वस्तू नष्ट होते, त्याप्रमाणे हा कार्बनही कमी होतो. यावरून एखाद्या धातू आणि सजीव प्राण्याचे वय ठरवले जाते.

हिंदू पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार

सुप्रीम कोर्टाने कथित शिवलिंग आढळण्याची जागा सुरक्षित आणि संरक्षित केली जावी, असे म्हटले होते. याचा हवाला देत जिल्हा कोर्टाने कार्बन डेटिंग वा इतर वैज्ञानिक पद्धतीने तपासणीची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता हिंदू पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे हिंदू पक्षाचे वकील शिवम गौड यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी