महिलांच्या सुरक्षेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हैदराबादमधील मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त बी. सुमती यांनी घेतलेला निर्णय सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशाच्या भूमिकेत बसस्टॉपवर उभं राहून त्यांनी महिलांना प्रत्यक्षात कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, याची चाचणी घेतली. या कारवाईत तब्बल ४० जणांना ताब्यात घेण्यात आलं.
मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त बी. सुमती या मध्यरात्री ते पहाटे ३ वाजेपर्यंत दिलसुखनगर बसस्टॉपवर कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय एकट्या उभ्या होत्या. त्या सार्वजनिक वाहतुकीची वाट पाहणाऱ्या महिलेप्रमाणे तिथे थांबल्या होत्या.
काही मिनिटांतच सुरू झाला त्रास
या दरम्यान अनेक पुरुषांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. काही जण बाइकचा वेग कमी करून अश्लील टिप्पणी करत होते, तर काही जण वारंवार त्यांच्या भोवती फिरत वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारत होते. मात्र, या सर्वांवर पोलीसांची गुप्त नजर होती. पोलीस उपनिरीक्षक आणि निरीक्षक अधिकारी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी ही पथके सज्ज होती.
या संपूर्ण कारवाईनंतर महिलांना त्रास देणाऱ्या सुमारे ४० जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या सर्वांना समुपदेशनासाठी पाठवण्यात येणार आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नव्हते. तर काही जण विद्यार्थी, शिकलेले तरुण आणि नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी असल्याचंही समोर आलं आहे. यातील अनेक जण मद्यधुंद अवस्थेत होते, तर काहींनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तक्रारीनंतर उचललं पाऊल
दिलसुखनगर परिसरात विशेषतः रात्री महिलांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. १ मे रोजी मलकाजगिरी पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बी. सुमती यांनी या प्रकरणाला प्राधान्य दिलं.
परिसराचा आढावा घेतल्यानंतर हॉस्टेल परिसरांजवळ रात्री उशिरा महिलांना मद्यधुंद अवस्थेतील तरुणांकडून त्रास दिला जात असल्याचं निदर्शनास आलं.
"प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता"
केवळ अहवालांवर अवलंबून न राहता महिलांना प्रत्यक्षात कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, हे समजून घेण्यासाठी सुमती यांनी स्वतः मैदानात उतरायचा निर्णय घेतला. या मोहिमेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना त्यांच्या कुटुंबीयांसमक्ष समुपदेशनासाठी बोलावलं. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी कसं वागावं, याबाबत त्यांना समज देण्यात आली आणि पुन्हा असं वर्तन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
बी. सुमती यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करीमनगर येथे डीएसपी म्हणून केली होती. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारच्या प्रत्यक्ष कारवाया केल्या असून, त्याचं नागरिकांकडून कौतुक झालं होतं.
सुमारे २५ वर्षांपूर्वीही त्यांनी काझीपेट रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे अंडरकव्हर राहून महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. तेलंगणा केडरच्या या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी यापूर्वी राज्य गुप्तचर विभाग (SIB) तसेच माओवादी आत्मसमर्पण मोहिमांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सध्या IG अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुमती यांच्या या कारवाईची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांनी त्यांना “लेडी सिंघम” अशी उपाधी देत त्यांचं कौतुक केलं आहे.