एका निवृत्त लष्करी जवानाने केलेल्या भयानक कृत्याने संपूर्ण हैदराबाद हादरले आहे. या निवृत्त जवानाने पत्नीचा निर्घृण खून करून नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळले आणि तलावात फेकून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या आरोपी निवृत्त जवानाचे नाव गुरुमूर्ती असून पत्नीचे नाव पुट्टावेंकट माधवी (वय 35) होते. पोलीस चौकशीत आरोपी गुरूमूर्तीने आपला गुन्हा कथितपणे कबूल केला. ही घटना 15 जानेवारीला घडली होती. माधवी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर पोलीस तपासात ही घटना उघडकीस आली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबाद रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरप्रीत पोलीस ठाण्यात मयत माधवी हिच्या आईने शुक्रवारी 17 जानेवारीला त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. माधवीचे 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि ती आपल्या पती आणि दोन मुलांसह राहत होती. माधवीचा पती गुरूमूर्ती निवृत्त जवान असून कंचनबाग येथे सध्या सुरक्षारक्षक म्हणून काम पाहतो, असे तक्रारीत म्हटले होते. तसेच गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे कुटुंब मीरप्रीत पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वेंकटेश्वर कॉलनीत राहत होते. 16 जानेवारीला माधवीचे पती गुरूमूर्तीसह भांडण झाले होते. त्यानंतर ती घराबाहेर पडली होती, असे माधवीच्या आईने तक्रारीत म्हटले होते.
पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या तपासासाठी माधवीचा पती गुरुमूर्ती याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्याने पत्नीचा खून करून नंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यांना प्रेशर कुकरमध्ये उकळल्याचे कथितपणे कबूल केले.
एल. बी. नगरच्या डीसीपीने घटनेची अधिक माहिती दिली, ''17 जानेवारीला आमच्याकडे माधवी बेपत्ता असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर चौकशी दरम्यान आरोपी पती गुरुमूर्तीने आपला गुन्हा कबूल केला. मात्र, अद्याप आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. सध्या चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, त्याने चाकूने पत्नीचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर त्यांना तलावात फेकले. या माहितीच्या आधारे आम्ही तपास करत आहोत.''
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या बातमीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरुमूर्तीने माधवीच्या पालकांना सांगितले होते की घरात झालेल्या भांडणानंतर माधवी घरातून निघून गेली. मात्र, पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपी गुरुमूर्तीने 15 जानेवारी रोजी रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले.
गुन्हा लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पोलिस सूत्रांनी उघड केले की, गुरुमूर्तीने खून केल्यानंतर मृतदेह त्यांच्या बाथरूममध्ये नेला. तिथे मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळले आणि हाडे बारीक करण्यासाठी मुसळ वापरला. तीन दिवसांच्या कालावधीत, त्याने अवशेष एका पिशवीत भरले आणि जवळच्या तलावात फेकून दिल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले आहे.
माधवीच्या मृतदेहाच्या अवशेषांचा शोध सुरू
आरोपीने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, पोलीस मीरप्रीत येथील तलावात माधवीच्या मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेत आहेत. त्यासाठी शोधपथक आणि श्वानपथक कार्य करत आहेत. मात्र, बुधवारपर्यंत निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासारखा कुठलाही पुरावा सापडला नाही. पोलीस अधिकारी नागाराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा पुरावा सापडेपर्यंत याप्रकरणाचा तपास 'बेपत्ता केस' म्हणूनच सुरू आहे.
आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी
आरोपी गुरुमूर्ती आणि पीडित माधवी यांचे 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. ही घटना घडली तेव्हा त्यांची मुले गुरुमूर्तीच्या बहिणीकडे म्हणजेच त्यांच्या आत्याच्या घरी गेली होती. दरम्यान, घटना घडल्यानंतर आरोपी गुरूमूर्तीने माधवीच्या पालकांची दिशाभूल करण्यासाठी भांडणानंतर माधवी घर सोडून निघून गेल्याचे सांगितले.
पीटीआयने घटनास्थळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत गुरुमूर्ती आणि माधवी यांच्या घरातील दृश्ये दिसत आहेत.