नवी दिल्ली : मक्याचे उत्पादन सध्याच्या ५५ दशलक्ष टनांवरून वाढवून पुढील दशकात ७५ दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचे आवाहन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक एम. एल. जाट यांनी केले.
हैदराबाद येथे परिषदेला संबोधित करताना त्यांनी भारताचे मका उत्पादन ५५ दशलक्ष टनांवर पोहोचल्याबद्दल आणि गेल्या दशकात उत्पादकतेत झालेली भरीव वाढ याबद्दल मका संशोधन समुदायाचे अभिनंदन केले.
महासंचालक म्हणाले की, तांत्रिक नवकल्पना, सुधारित पीक व्यवस्थापन आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर याद्वारे पुढील दशकात उत्पादन ७५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवावे आणि उत्पादकतेत दीडपट वाढ करावी.
पारंपारिक ४एफ व्हिजनचा (अन्न, पशुआहार, चारा आणि इंधन) विस्तार करून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून ५एफ व्हिजन राबवण्यावर त्यांनी भर दिला. संशोधन आणि कृषी विस्तारामुळे शेतकऱ्यांचा नफा आणि जीवनमान उंचावले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला.
इतर महत्त्वाच्या पिकांची, तेलबिया आणि डाळींची हानी न करता, मक्याच्या उत्पादनातील तफावत भरून काढण्यासाठी 'सिस्टम-सायन्स' दृष्टिकोन स्वीकारण्याचे त्यांनी सुचवले.
बियाणे प्रणालीच्या माध्यमातून परवडणाऱ्या आणि दर्जेदार बियाण्यांची - विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील संकरित बियाण्यांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आयसीएआरचे उपमंचालक (पीक विज्ञान) डी. के. यादव यांनी 'अखिल भारतीय समन्वित मका संशोधन प्रकल्प' अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
डी. के. यादव यांनी काही विशेष मुद्द्यांवर भर दिला. प्रसिद्ध मका शास्त्रज्ञ एस. वासल यांनी यानिमित्ताने देशातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सुधारित जाती आणि संकरित वाणांचा विकास वेगवान करण्यासाठी साध्या आणि किफायतशीर प्रजनन पद्धतींचा पुरस्कार केला.
साखर उत्पादनांत मागील वर्षीच्या तुलनेत वाढ
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या २०२६-२७ हंगामाच्या पहिल्या महिन्यात देशात एकूण ८.४५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यामुळे चालू सणासुदीच्या हंगामात देशांतर्गत साखरेचा पुरवठा वाढण्यास मदत झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत उत्पादनाचे प्रमाण केवळ १ लाख टन होते. ऑक्टोबर-सप्टेंबर या कालावधीत चाललेल्या २०२५-२६ च्या संपूर्ण हंगामात देशाचे एकूण साखरेचे उत्पादन २७९.६० लाख टन होते.