राष्ट्रीय

सत्ता आल्यास महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करणार; महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांचा विश्वास

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारला १० वर्षे लागली. तरीही अद्याप त्याची अंमलबाजवणी मात्र केलेली नाही. त्यामुळे केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षण लागू केले जाईल, असा विश्वास महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी व्यक्त केला.

अलका लांबा या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला काँग्रेस संघटन मजबूत करणे, भारत जोडो न्याय यात्रा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या तीन दिवसांत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर महिला काँग्रेसचा भर आहे. महिला सशक्तीकरणाला काँग्रेस पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे. आता विधानसभा आणि लोकसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे, यावर महिला काँग्रेसचा भर आहे, असे लांबा म्हणाल्या.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देणाऱ्या भाजपच्या राज्यातच महिला अत्याचारी मोकाट आहेत. महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार करणारा भाजपचा खासदार बृजभूषण शरण सिंह अजूनही मोकाटच आहे. गुन्हा दाखल होऊन सहा महिने झाले तरी कारवाई मात्र झालेली नाही. पंतप्रधानांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यातील गुन्हेगार भाजपशी संबंधित असून  या गुन्हेगारांनी मध्य प्रदेशात भाजपच्या प्रचारातही सहभाग घेतला होता. जनतेचा तीव्र आक्रोश बघून नंतर कारवाई करण्यात आली. गुजरातमध्ये बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करून हत्याकांड करणाऱ्या ११ दोषींना शिक्षेतून मुक्त करण्याचे काम भाजप सरकारने केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या ११ जणांना मुक्त करण्याचा निर्णय रद्द करत त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी केली. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. भाजपच्या राज्यात मागील दोन वर्षांत देशभरातून तब्बल १० लाख महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून सर्वात जास्त महिला बेपत्ता आहेत. या महिला गेल्या कुठे? असा सवाल करत भाजप सरकारमध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची टीका लांबा यांनी केली. 

खासदार राहुल गांधी यांनी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली असून या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. या न्याय यात्रेत नारीशक्तीला न्याय देण्याचाही अंतर्भाव आहे. ज्या महिलांवर अन्याय-अत्याचार झाला त्यांना या यात्रेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही ऐतिहासिक आहे. या यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आसामचे भाजप सरकार बिथरले आहे. यातूनच यात्रेवर हल्ले करण्याचे प्रकार झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त