राष्ट्रीय

इंडिया आघाडीची दिल्लीत होणारी बैठक तडकाफडकी रद्द

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपला प्रचंड यश मिळाले आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीला यामुळे धक्का बसला आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे. तीन मोठ्या नेत्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील बैठक १८ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपला प्रचंड यश मिळाले आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीला यामुळे धक्का बसला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीतील काही पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद झाले होते. त्यामुळे काँग्रेससह समाजवादी पक्ष व नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल हे पक्ष स्वतंत्र लढले होते. निकाल येताच या नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसने इंडिया आघाडीची बैठक घेण्यास टाळाटाळ केली होती. निकालानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक बोलावली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या बैठकीपासून दूर राहणेच पसंत केले. त्याचप्रमाणे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही बैठकीला येण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ही बैठकच रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे.

प. बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असे स्पष्टपणे कळवले आहे. त्या ६ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत उत्तर बंगालचा दौरा करणार आहेत. ६ डिसेंबरला बैठक होणार असल्याचे मला आधी माहीत नव्हते. तशी माहिती असती तर मी माझ्या वेळापत्रकात बदल केला असता, असे त्यांनी सांगितले आहे.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे