राष्ट्रीय

भारतीयांचा तुर्की-अझरबैजानला दणका! बॉलिवूडसह व्यापाऱ्यांचा बहिष्कार; पर्यटकांचा नकार, JNU नेही रद्द केला तुर्की विद्यापीठाशी करार

आमच्या देशाविरोधात भूमिका घेणाऱ्यांसोबत कोणतेच संबंध नकोत, अशी भूमिका अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत. व्यापाऱ्यांमध्येही प्रचंड चीड आहे. तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे.

Krantee V. Kale

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूरअंतर्गत केलेल्या कारवाईनंतर तुर्कस्तान आणि अझरबैयजान या देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारतावर हल्ले करण्यासाठी तुर्कस्तानने तर पाकिस्तानला शस्त्रांचीही मदत केली. परिणामी भारतीय नागरीक या दोन्ही देशांवर चांगलेच संतापले आहेत.

आमच्या देशाविरोधात भूमिका घेणाऱ्यांसोबत कोणतेच संबंध नकोत, अशी भूमिका अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत. कलाकार, व्यापारी, खेळाडूंसह सर्वांमध्ये प्रचंड चीड आहे. देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे. तुर्कीचे सफरचंद खरेदी करण्यापासून ते पर्यटनापर्यंत सर्व गोष्टींना विरोध केला जात आहे.

फळ व्यापाऱ्यांचा दणका

पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद बंद केले आहे. सामान्य नागरिकही बहिष्कार तुर्की मोहिमेत सामील झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुर्की सफरचंदांच्या मागणीत मोठी घट झाली असून नागरिक तुर्की सफरचंदांऐवजी इतर ठिकाणांहून सफरचंद खरेदी करत आहेत. पुण्याच्या फळ बाजारात, साधारण १००० ते १२०० कोटींची उलाढाल होते, ती थांबविण्यात आली आहे. "आम्ही तुर्कीमधून सफरचंद खरेदी करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याऐवजी हिमाचल, उत्तराखंड, इराण आणि इतर प्रदेशांमधून सफरचंद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे" असे पुणे एपीएमसी सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे यांनी सांगितले. भारताच्या लष्करी दलांना आणि प्रशासनाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. गाझियाबाद, साहिबाबाद येथील फळ व्यापाऱ्यांनीही तुर्कस्तानची सफरचंदं आणि इतर फळांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

संगमरवराची आयात थांबवली

उदयपूरच्या मार्बल व्यापार्‍यांनीही तुर्कीसोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयपूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराना यांनी सांगितले, “उदयपूर हे आशियातील सर्वात मोठे मार्बल निर्यात केंद्र आहे. भारतात आयात होणाऱ्या सुमारे ७० टक्के मार्बलचा पुरवठा तुर्कीकडून होतो. कमिटीच्या सर्व सदस्यांनी पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे तुर्कीसोबतचा व्यापार थांबवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत सरकार एकटे नाही

फक्त उदयपूरच नव्हे, तर देशातील सर्व मार्बल संघटनांनी तुर्कीशी व्यापार बंद केला, तर जगाला एक ठोस संदेश जाईल की भारत सरकार एकटे नाही, आपले उद्योगजगत आणि संपूर्ण भारतीय जनता सरकारसोबत खंबीरपणे उभी आहे... आपण तुर्कीशी व्यापार थांबवला, तर भारतीय मार्बलची मागणी निश्चितच वाढेल, असेही ते म्हणाले.

‘जेएनयू’चा तुर्की विद्यापीठाशी करार रद्द

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) तुर्कीयेतील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असे ‘जेएनयू’ने सांगितले. यंदा ३ फेब्रुवारी रोजी तीन वर्षांसाठी हा सामंजस्य करार झाला होता. या सामंजस्य करारातंर्गत आम्ही विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण करणार होतो, असे ‘जेएनयू’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बहिष्कार टाकण्यात पर्यटक आघाडीवर, बुकिंग रद्द करण्यात २५० टक्के वाढ

बहिष्कार टाकण्यात पर्यटक देखील आघाडीवर आहेत. भारताकडून तुर्की आणि अझरबैयजानला जाणाऱ्या तिकीट बुकिंगमध्ये झपाट्याने घट झाली आहे. मेकमायट्रिपने दिलेल्या माहितीनुसार, अझरबैजान आणि तुर्कीयेसाठी बुकिंगमध्ये ६० टक्के घट नोंदवली आहे, तर तिकीट रद्द करण्यात फक्त एका आठवड्यात २५० टक्के वाढ झाली आहे. देशाप्रती एकता आणि आपल्या सशस्त्र दलांबद्दलच्या आदरापोटी, अझरबैजान आणि तुर्कीच्या सर्व सहली (आपत्कालीन परिस्थिती वगळता) रद्द करण्याची शिफारस ट्रॅव्हल कंपन्यांकडून केली जात आहे.

३,००० कोटी रुपयांचा महसूल तोटा?

EaseMyTrip ने तुर्कीयेला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत २२% आणि अझरबैजानला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ३०% घट झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यामुळे दोन्ही देशांना ३,००० कोटी रुपयांचा महसूल तोटा होईल, असा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे.

बॉलिवूडचाही बहिष्कार

‘राष्ट्र प्रथम’ हे धोरण स्वीकारत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) आणि ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) सारख्या चित्रपट उद्योगातील संस्थांनीही तुर्कीमधील चित्रीकरण स्थळांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. चित्रीकरणासाठी तुर्कीची निवड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आता विधानभवनात मंत्री, अधिकाऱ्यांनाच प्रवेश; विधिमंडळात मंत्र्यांना बैठका घेण्यास मनाई, हाणामारीमुळे अभ्यागतांना ‘नो एंट्री’

Ahmedabad Plane Crash : ''माफी मागा, नाहीतर..'' पायलट असोसिएशनची WSJ आणि Reuters ला कायदेशीर नोटीस

विठ्ठलाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी; चंद्रभागेत तीन महिला भाविक बुडाल्या, दोघींचा मृत्यू, एक बेपत्ता

तृणमूल सरकार गेल्यानंतरच बंगालचा विकास होईल; पंतप्रधानांची गर्जना

आमदार माजलेत, ही जनभावना! मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना कानपिचक्या