राजनाथ सिंह (संग्रहित छायाचित्र) (Photo-X/PTI)
राष्ट्रीय

देशाचे संरक्षण उत्पादन १.५१ लाख कोटींवर; केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

२०१४ मध्ये भारताचे संरक्षण उत्पादन ४६ हजार कोटींवर होते. ते आता विक्रमी १.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आयातीवर अवलंबून असलेला भारत आज उत्पादक आणि निर्यातदार म्हणून उदयास आला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली.

Swapnil S

लेह : २०१४ मध्ये भारताचे संरक्षण उत्पादन ४६ हजार कोटींवर होते. ते आता विक्रमी १.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आयातीवर अवलंबून असलेला भारत आज उत्पादक आणि निर्यातदार म्हणून उदयास आला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली.

येथे ‘सीमा रस्ते संघटने’च्या (बीआरओ) धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या १२५ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, एकेकाळी देशात शस्त्रास्त्रे आणि उपकरणे तयार करण्याची प्रणाली नव्हती. परंतु गेल्या दशकातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोठा बदल घडून आला आहे.

आपली संरक्षण निर्यात, १० वर्षांपूर्वी १ हजार कोटी रुपयांपेक्षा कमी होती, ती आता जवळपास २४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे,’ अशी माहिती सिंह यांनी दिली.

लडाख आणि जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांसह अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि मिझोरम या सात राज्यांमध्ये हे प्रकल्प उभारले गेले आहेत. यात २८ रस्ते, ९३ पूल आणि ४ विविध प्रकल्प यांचा समावेश असून त्यासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

‘बीआरओ’च्या तांत्रिक नवकल्पनांचे कौतुक करताना सिंह म्हणाले की, प्रगत अभियांत्रिकीमुळे पायाभूत प्रकल्पांच्या पूर्णतेला गती मिळाली आहे.

संरक्षण मंत्र्यांनी पुढे सांगितले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘बीआरओ’ने १६,६९० कोटी रुपये खर्च केला. २०२५ -२६ साठी १८,७०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. यावरून सरकारचा ‘बीआरओ’वर असलेला विश्वास स्पष्ट होतो.

गेल्या दोन वर्षांत ‘बीआरओ’ने ३५६ पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले असून, हे धोरणात्मक विकासातील एक महत्त्वाचे यश असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हिमालय, मरूभूमी, पूरग्रस्त आणि दाट जंगल क्षेत्रांमध्ये हे प्रकल्प यशस्वीपणे राबवून ‘बीआरओ’ने आपली अद्वितीय क्षमता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेत ‘बीआरओ’ची निर्णायक भूमिका ओळखून केंद्राने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ‘बीआरओ’चा निधी ६,५०० कोटी रुपयांवरून ७,१४६ कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.

मॉड्युलर पुलांचे बांधकाम यशस्वी

‘बीआरओ’ने ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स’ यांच्या सहकार्याने ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत विकसित केलेले क्लास-७० मॉड्युलर ब्रिजेस स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले. या मॉड्युलर पुलांचे अनेक मोक्याच्या ठिकाणी यशस्वी बांधकाम झाले आहे. स्थानिक पातळीवर संपूर्णपणे डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलेले हे पूल सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान कसे परिवर्तन घडवत आहे, याचे उत्तम उदाहरण आहेत,’ असे ते म्हणाले.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड