भाईंदर : जागतिक मेंदू दिनानिमित्त न्यूरोलॉजी तज्ज्ञांनी नागरिकांना मेंदूच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
तज्ज्ञांच्या मते, भारतात ३ कोटींहून अधिक नागरिक न्यूरोलॉजिकल विकारांनी प्रभावित असून देशाच्या एकूण आजारांच्या भारापैकी सुमारे १० टक्के भार या आजारांचा आहे. वाढता ताण, वायू प्रदूषण, बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि वाढते वय यामुळे स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन, पार्किन्सन्स, डिमेन्शिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. पवन पै यांनी सांगितले की, स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अचानक हात-पायात अशक्तपणा, बोलण्यात अडचण, तीव्र किंवा वेगळी डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा दृष्टीत बदल ही मेंदूची गंभीर इशारे असू शकतात.
याशिवाय, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स, मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर), मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मज्जातंतूंचे विकार यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांची सुरुवात अनेकदा अत्यंत सौम्य लक्षणांनी होते. वारंवार डोकेदुखी, विस्मरण, हात-पायात मुंग्या येणे, चालताना तोल जाणे, हात थरथरणे, झटके येणे किंवा बोलण्यात अचानक अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.
न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रणव मेहता यांनी सांगितले की, न्यूरोलॉजिकल आजार आता केवळ ज्येष्ठांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जनजागृती, वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे लाखो नागरिकांना अपंगत्वापासून वाचवता येईल.
सध्या भारतात मेंदू विकार ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: २० वर्षात भारतात डिन्मेशिया, ब्रेन टयूमर, पक्षाघाताचे प्रमाण वाढले आहे. हे विकार होणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक, सामाजिक तणावाला सामोरे जावे लागते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
योग्य वेळी निदान गरजेचे
योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञांकडून उपचार सुरू केल्यास अनेक मेंदूविकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि रुग्णाला दीर्घकाळ निरोगी व स्वावलंबी जीवन जगणे शक्य होते. तसेच खर्च कमी होतो.