दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण 
राष्ट्रीय

दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण

देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नसून पुढील ६० दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नसून पुढील ६० दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी स्पष्ट केले.

पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या वावड्या उठवून जाणीवपूर्वक घबराट पसरवली जात असून, नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने केले आहे. देशातील सर्व पेट्रोल पंप पूर्ण क्षमतेने सुरू असून कुठेही इंधन रेशनिंगचे आदेश दिलेले नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले.

पश्चिम आशियातील संकटामुळे इराणमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असला, तरी भारताने इतर देशांकडून पुढील दोन महिन्यांसाठीचा साठा आधीच निश्चित केला आहे. देशातील सर्व रिफायनरी सध्या १०० टक्क्यांहून अधिक क्षमतेने कार्यरत असून पुरवठ्यामध्ये कोणतीही तूट नाही. भारताकडे एकूण ७४ दिवस पुरेल इतकी साठवणूक क्षमता असून, प्रत्यक्ष साठा सध्या ६० दिवसांचा आहे. यामध्ये कच्च्या तेलासह धोरणात्मक साठ्याचाही समावेश आहे. जगामध्ये काहीही घडले तरी प्रत्येक भारतीय नागरिकासाठी किमान दोन महिने स्थिर पुरवठा उपलब्ध राहील, अशी ग्वाही मंत्रालयाने दिली आहे.

एलपीजीच्या बाबतीतही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सरकारने म्हटले आहे. देशांतर्गत एलपीजी उत्पादनात ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून दररोज ५० हजार टन उत्पादन घेतले जात आहे. याव्यतिरिक्त अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांतून ८ लाख टन एलपीजीची आयात निश्चित करण्यात आली आहे. देशातील २२ टर्मिनल्सवर हा साठा पोहोचत असून पुढील एक महिन्याचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. ग्राहकांनी घबराटीतून बुकिंग केल्यामुळे सिलिंडरची मागणी वाढली होती, मात्र आता ती पुन्हा पूर्वपदावर येत आहे.

पेट्रोल पंपांवर निर्माण झालेली खेळत्या भांडवलाची अडचण दूर करण्यासाठी सरकारने कंपन्यांना क्रेडिट मर्यादा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर इंधन टंचाई किंवा आणीबाणीच्या उपाययोजनांबाबत चुकीचे दावे पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी