नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या ‘कुछ खुशी, कुछ गम’चा प्रत्यय देणारी आहे. उत्पादन क्षेत्राने नांगी टाकल्याने भारताचा २०२४-२५ चा वार्षिक विकास दर चार वर्षांच्या तळाला गेला असून तो ६.५ टक्के नोंदला गेला आहे. मागील वर्षी २०२३-२४ मध्ये विकास दरातील वाढ ९.२ टक्के होती. मात्र, २०२४-२५ च्या जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.४ टक्क्याने वाढला आहे. ही वाढ तिसऱ्या तिमाहीच्या ६.२% च्या तुलनेत १% पेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातील मागणीत वाढ, सरकारी खर्चात वाढ आणि निर्यातीत चांगली कामगिरी यामुळे ‘जीडीपी’ वाढला आहे.
विकास दराचे आकडे हे रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा कमी आहेत. आरबीआयने भारताचा विकास दर ६.६ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
२०२४-२५ च्या जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.४ टक्क्याने वाढला. मात्र, गेल्यावर्षी याच कालावधीत विकास दर ८.४ टक्के होता. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा विकास दर कमी झाला आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत ‘जीडीपी’त चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान, आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास दर जानेवारी ते मार्च २०२५ मध्ये ५.४ टक्के होता.
भारताची अर्थव्यवस्था ३.९ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स
भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार ३३०.६८ लाख कोटी म्हणजे ३.९ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स झाला आहे. येत्या काही वर्षात भारत ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल, असा अंदाज आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली.
उत्पादन क्षेत्राने नांगी टाकली
उत्पादन क्षेत्राने या वर्षात नांगी टाकली. २०२३-२४ मध्ये उत्पादन क्षेत्र १२.३ टक्क्याने वधारले होते, तर २०२४-२५ मध्ये उत्पादन क्षेत्र ४.५ टक्क्यांपर्यंत घसरले. शेती क्षेत्राने २०२४-२५ या वर्षात चांगली कामगिरी केली. हे क्षेत्र ४.६ टक्क्याने वाढले. गेल्यावर्षी हे क्षेत्र २.७ टक्क्याने वाढले होते.
बांधकाम क्षेत्रात वधारणा
बांधकाम क्षेत्र १०.८ टक्क्याने वधारले. गेल्यावर्षी बांधकाम क्षेत्र ८.७ टक्क्याने वधारले. तर वीज, गॅस, पाणी पुरवठा वितरण व अन्य युटिलिटी क्षेत्र २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत ५.४ टक्के वाढले. गेल्यावर्षी हेच क्षेत्र ८.८ टक्क्याने वधारले होते.
व्यापार, हॉटेल, वाहतूक, कम्युनिकेशन व सेवा आदी ६ टक्क्याने वधारले. गेल्यावर्षी हेच क्षेत्र ६.२ टक्के होते. तर वित्त, बांधकाम व व्यावसायिक सेवा क्षेत्र २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत ७.८ टक्क्याने वाढले. गेल्यावर्षी याच कालावधीत हे क्षेत्र ९ टक्क्याने वाढले होते. तर सार्वजनिक प्रशासन, संरक्षण व अन्य सेवांचा विकास दर ७.८ टक्के राहिला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत नॉमिनल जीडीपीत ९.८ टक्के वाढ झाली. तो आता ३३०.६८ लाख कोटी झाला. तर रियल जीडीपी १८७.९७ लाख कोटी झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याच्या निर्णयामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली असून खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास विलंब केला. पण, शेवटच्या तिमाहीत भांडवली खर्चात ९.४ टक्के वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा ‘जीडीपी’ कमी
भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या गेल्या पतधोरणात वार्षिक विकास दर ६.६ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता, तर २०२४-२५च्या जानेवारी ते मार्चदरम्यान आरबीआयने विकास दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. केंद्रातील मोदी सरकार भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची झाली असल्याचे सांगत असतानाच ही विकास दराची आकडेवारी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, भारत २०२५-२६ च्या अखेरपर्यंत जपानला मागे टाकून अमेरिका, चीन, जर्मनीनंतर चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल.