GST संकलनाचा विक्रम; ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

GST संकलनाचा विक्रम; ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

ऑक्टोबर २०२६ मध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ संकलनात तब्बल २२.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२६ मध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ संकलनात तब्बल २२.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या महिन्यात देशाचे एकूण जीएसटी संकलन २.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असून, सलग चौथ्या महिन्यात ‘जीएसटी’ महसुलाने दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात १४.७ टक्के वाढ झाली होती. त्या तुलनेत ऑक्टोबरमधील वाढ अर्थव्यवस्थेतील व्यवहारांना मिळणारी गती दर्शवते. ‘जीएसटी’ महसुलातील या वाढीमध्ये आयात क्षेत्राचा मोठा वाटा आहे. ऑक्टोबरमध्ये आयातीवरील ‘जीएसटी’ महसूल ४२.२ टक्क्यांनी वाढून ७२ हजार २४६ कोटी रुपयांवर पोहोचला. तर देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणाऱ्या ‘जीएसटी’ महसुलात १५.८ टक्क्यांची वाढ होऊन तो १.५९ लाख कोटी रुपये झाला आहे.

सात महिन्यांत जीएसटी संकलन १४.७८ लाख कोटी

या काळात सरकारने २७ हजार ९३४ कोटी रुपयांचा कर परतावा दिला. परतावा वजा केल्यानंतर निव्वळ ‘जीएसटी’ महसूल २.०३ लाख कोटी रुपये झाला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत एकूण जीएसटी संकलन १३.२ टक्क्यांनी वाढून १४.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.दरम्यान, राज्यांमधील जीएसटी संकलनाच्या वाढीचा सर्वाधिक वेग आसाममध्ये दिसून आला. आसाममध्ये महसूल तब्बल ४७ टक्क्यांनी वाढून १ हजार ९३४ कोटी रुपयांवर पोहोचला. झारखंडमध्ये ३१ टक्के आणि मध्य प्रदेशात २९ टक्के वाढ झाली. दुसरीकडे, तमिळनाडूमध्ये केवळ ३ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा

राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्राने सर्वाधिक जीएसटी महसूल संकलित करण्याचा अव्वल क्रमांक कायम राखला. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातून ३५ हजार १५० कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला. मात्र, वाढीचा दर पाहता उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशच्या जीएसटी महसुलात २४ टक्क्यांची वाढ होऊन तो १० हजार २३५ कोटींवर पोहोचला. महाराष्ट्रात ही वाढ १३ टक्के होती. कर्नाटकात १८ टक्के, गुजरातमध्ये १६ टक्के, तर दिल्लीत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा पुन्हा एल्गार! ज्ञानेश कुमार नसते तर मोदी पंतप्रधान झालेच नसते : राहुल गांधी; रामलीला मैदानावर SIR विरोधी महारॅली

संविधानाच्या आडून अराजकतेचा डाव; ठाण्यातील ‘लोकतंत्र बचाव पदयात्रे’त काँग्रेसवर फडणवीसांचा घणाघात

शीखांच्या जखमांवर काँग्रेसने मीठ चोळले - अमित शहा

महादेव बेटिंग अ‍ॅपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरचे भारतात प्रत्यार्पण

पाणी संपल्यावर विकासाचे इमले काय कामाचे?