राष्ट्रीय

यंदा मान्सून दमदार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज, १०५ टक्के पाऊस बरसणार

एप्रिल महिना उजाडला की, सर्वांना उत्सुकता लागून राहते ती यंदाच्या मान्सूनची. सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असतानाच, यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून सामान्यपेक्षा चांगला असेल.

Swapnil S

नवी दिल्ली : एप्रिल महिना उजाडला की, सर्वांना उत्सुकता लागून राहते ती यंदाच्या मान्सूनची. सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असतानाच, यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून सामान्यपेक्षा चांगला असेल. पाऊस दमदार बरसणार असून पावसाचे प्रमाण १०५ टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाचे सचिव एम. रविंद्रन यांनी वर्तवला आहे.

यावर्षी अल निनोची परिस्थिती निर्माण होणार नाही. सध्या देशाच्या अनेक भागात तीव्र उष्णता आहे. एप्रिल ते जूनदरम्यान अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. यामुळे काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट भेडसावू शकते, असे ‘आयएमडी’ प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

“भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय उपखंडात नेहमीपेक्षा कमी पाऊस होण्यासाठी जबाबदार असलेली अल निनोसारखी परिस्थिती यंदा नाही. भारतात सामान्यपणे १ जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये येतो. त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकत देशभरात बरसतो आणि सप्टेंबरच्या मध्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो,” असेही महापात्रा म्हणाले.

मराठवाड्यात दीर्घकाळ पावसाचा मुक्काम

“मराठवाड्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊसकाळ असेल तर मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यासह कोकण आणि विदर्भातही पावसाच्या सरी सरासरी ओलांडतील, असा अंदाज आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्येच यंदा मान्सूनला पोषक परिस्थिती असेल. सरासरीच्या तुलनेमध्ये २०२५ मध्ये १०५ टक्के पाऊस कोसळेल. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे,” असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितले.

‘स्कायमेट’चाही चांगल्या पावसाचा अंदाज

भारतातील हवामानविषयक अंदाज वर्तवणाऱ्या ‘स्कायमेट’नेही यंदा चांगल्या मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. “मान्सूनचा हा हंगाम सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होईल. यात ५ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्याने केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल,” असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक