नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंडने रविवारी प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू केल्याची घोषणा केली. हा प्रस्ताव २०१५ पासून रखडला होता. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन १६ मार्चपासून चार दिवसांच्या दौऱ्यावर असल्याने या घोषणेला महत्त्व आहे.
वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीत व्यापार वाढवण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडने एप्रिल २०१० मध्ये सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार (CECA) साठी वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. मात्र, चर्चेच्या नऊ फेऱ्यांनंतर २०१५ मध्ये ही चर्चा रखडली.
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार (FTA) सर्वसमावेशक आणि परस्पर फायदेशीर वाटाघाटी सुरू झाल्याची घोषणा करताना दोन्ही देशांना आनंद होत आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले यांच्या बैठकीनंतर मंत्रालयाने ही घोषणा केली. भारत-न्यूझीलंड ‘एफटीए’ वाटाघाटींचे उद्दिष्ट पुरवठा साखळी एकत्रीकरण वाढवणारे आणि बाजारपेठेतील प्रवेश सुधारण्यासाठी संतुलित परिणाम साध्य करणे आहे, असे त्यात म्हटले आहे.