राष्ट्रीय

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

No Fuel Shortage : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजारावर दबाव वाढत असला तरी भारतामधील इंधन वितरण सुरळीत सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकटाची भीती निर्माण होत असताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शनिवारी (दि.१४) महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी करत देशभरातील पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पुरेसा असल्याचे सांगितले.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजारावर दबाव वाढत असला तरी भारतामधील इंधन वितरण सुरळीत सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नागरिकांनी घाबरून इंधन साठवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

इंधन साठवण्याबाबत सुरक्षा सूचना

मंत्रालयाने इंधन हाताळताना सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. सैल किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल साठवू नये, कारण त्यामुळे आग आणि अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात पेट्रोल पंपांना इंधन वितरणासाठी ठरलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

एलपीजी उत्पादनात ३० टक्के वाढ

घरगुती वापर आणि अत्यावश्यक सेवांसाठी एलपीजीचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी (Indian refineries) भारतीय शुद्धीकरण कारखान्यांनी एलपीजी उत्पादनात ३० टक्क्यांची वाढ केली आहे. पेट्रोलियम आणि ऑइल रिफायनरी विभागाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, या वाढीमुळे घरगुती ग्राहक, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था यांना गॅसचा पुरवठा अखंडित राहील.

व्यावसायिक गॅस वितरण राज्यांच्या ताब्यात

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी केंद्र सरकारने त्याचे व्यवस्थापन राज्य सरकारांकडे सोपवले आहे. राज्य सरकारांनी प्राधान्य क्षेत्र निश्चित करून महत्त्वाच्या क्षेत्रांना गॅस उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सरकारने नियमित कोट्याव्यतिरिक्त ४८,००० किलोलीटर केरोसीनचा अतिरिक्त साठा मंजूर केला आहे. हा साठा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यांकडून स्थानिक वितरण केंद्रे निश्चित केली जात आहेत.

भारताची ऊर्जा सुरक्षितता मजबूत

शुक्रवारी (दि.१३) केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेबाबत माहिती दिली. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद झाला तरी भारताने इंधन आयातीसाठी पर्यायी मार्ग आणि विविध देशांमधून पुरवठ्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेत बोलताना पुरी यांनी स्पष्ट केले की, देशातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सक्षम आहे आणि नागरिकांनी घाबरून इंधन साठा करण्याचे टाळावे.

पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर

ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार कोळशासारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचाही वापर वाढवत आहे. Coal India ला लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कोळसा पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे द्रवरूप इंधनाच्या बाजारात निर्माण होणाऱ्या संभाव्य तुटवड्याचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या मते, देशांतर्गत उत्पादन वाढवणे, पर्यायी मार्गांचा वापर आणि विविध ऊर्जा स्रोतांचा पुरवठा या उपाययोजनांमुळे भारताची ऊर्जा व्यवस्था सध्याच्या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे.

आजचे राशिभविष्य, १३ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मंगळागौरीसाठी अनुष्का सरकटेचा मराठमोळा साज; पोपटी नऊवारीत खुललं सौंदर्य

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा सुगंधी केसर मोदक; आताच नोट करा सोपी रेसिपी

Kareena Kapoor : पेस्टल साडीत करीनाचा ग्लॅमरस अंदाज; पाहा खास लूक

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर