नवी दिल्ली : अन्नधान्य, इन्धन आणि उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सप्टेंबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताची महागाई वाढून ११.३९ टक्क्यांवर पोहोचली. ऑगस्ट महिन्यात हा दर ९.९२ टक्के होता. बुधवारी जाहीर झालेला सप्टेंबरमधील घाऊक महागाईचा ११.३९% दर हा नवीन मालिकेतील सर्वोच्च असल्याचेही स्पष्ट झाले.
अन्नधान्य निर्देशांकातील महागाई ऑगस्ट महिन्यातील ७.०५ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये वाढून ८.६६ टक्क्यांवर पोहोचली. उत्पादित वस्तूंच्या बाबतीत डब्लूपीआय महागाई ९.७६ टक्क्यांच्या उच्चांकावर होती. ती ऑगस्टमध्ये ८.३७ टक्के होती. इंधन आणि वीज क्षेत्रात, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई सप्टेंबरमध्ये २५.८५ टक्के होती. तर मागील महिन्यात ती २२.९३ टक्के होती.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने डब्लूपीआय आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, सप्टेंबर २०२६ मध्ये खनिज तेले (पेट्रोलियम उत्पादने), अन्न वस्तू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कोळसा आणि लिग्नाइट, मूलभूत धातूंचे उत्पादन, रसायने आणि रासायनिक उत्पादने, वस्त्रोद्योग, रबर आणि प्लास्टिक उत्पादने आणि विद्युत उपकरणे या सर्व घटकांमुळे डब्लूपीआय महागाईत वाढ झाली आहे.
पश्चिम आशियातील युद्ध आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा मार्ग असलेल्या 'स्ट्रेट ऑफ हार्मुझ'मधील अडथळ्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच डब्लूपीआय वाढत्या मार्गावर आहे. यामुळे जागतिक पातळीवर कच्चे तेल आणि खतांचे खर्च वाढले. त्याचा परिणाम अन्न व वस्तूंच्या किमतींवर झाला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने गेल्या आठवड्यात बेंचमार्क धोरणात्मक दर २५ आधार अंकांनी वाढवून ५.५० टक्के केले आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे ऑगस्टच्या ४.८३ टक्क्यांवरून वाढून सप्टेंबरमध्ये महागाई ५.५४ टक्क्यांच्या २३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.
आर्थिक महागाईची कारणे : पेट्रोलियम उत्पादन, अन्नधान्य, कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कोळसा, मूलभूत धातू, रसायने, रबर आणि प्लॅस्टिक उत्पादने.
इंधन आणि उत्पादित वस्तूंचा वाढता भार : उत्पादित वस्तूंमधील घाऊक महागाई ९.७६ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. तर इंधन आणि वीज बास्केटमध्ये हा दर २५.८५ टक्के नोंदवला गेला.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव : चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच घाऊक महागाईचा आलेख उंचावत आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि 'स्ट्रेट ऑफ हॉर्मूज'च्या ब्लॉकलेडमुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे जागतिक स्तरावर कच्चे तेल आणि खतांचे दर वाढले असून, त्याचा थेट परिणाम अन्नधान्य आणि वस्तूंच्या किंमतींवर झाला आहे.
रिझर्व्ह बँकेची कारवाई : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने गेल्या आठवड्यात बेंचमार्क पॉलिसी दरांमध्ये २५ आधार अंकांची वाढ करून ते ५.५० टक्क्यांवर नेले आहेत.
किरकोळ महागाईतही वाढ : या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या किंमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई २३ महिन्यांच्या उच्चांकी ५.५४ टक्क्यांवर (ऑगस्टमध्ये ४.८३%) पोहोचली आहे.
अन्नधान्य, इंधन तसेच उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्या
सप्टेंबरमधील महागाई : ११.३९ टक्के (ऑगस्टमध्ये ९.९२%)
खाद्यपदार्थ महागाई : ८.६६ टक्के (ऑगस्टमध्ये ७.०५%)
उत्पादित वस्तू : ९.७६% (श्रेणीतील उच्चांक)
इंधन आणि वीज : २५.८५ टक्के (ऑगस्टमध्ये २२.९३%)