नवी दिल्ली : भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जात असून या कारवायांचे स्वरूप अधिकच आक्रमक होत चालले आहे. भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळ (LoC) असलेल्या दहशतवादी लाँचपॅडवर अचूक गोळीबार करून ती ठिकाणे उद्ध्वस्त केली. हे लाँचपॅड पूर्णतः जळून खाक झाले असून या कारवाईचा व्हिडिओही भारतीय सैन्याने अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे.
हि कारवाई पाकिस्तानकडून ८ आणि ९ मे २०२५ च्या रात्री जम्मू, काश्मीर आणि पंजाबमधील विविध शहरांमध्ये करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांच्या प्रतिउत्तरा दाखल करण्यात आली. भारतीय लष्कराच्या या तात्काळ आणि ठोस कारवाईमुळे नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा भारताची सामरिक ताकद अधोरेखित झाली आहे.
भारतीय सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लाँचपॅडचा वापर भारतातील नागरिक तसेच सुरक्षा दलांविरोधात दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी केला जात होता. ही ठिकाणे दहशतवादी कारवायांसाठी महत्त्वाची केंद्रे बनली होती.
या हल्ल्यामुळे दहशतवादी गटांच्या पायाभूत सुविधांना तसेच त्यांच्या हालचाली आणि कारवाई क्षमतेला मोठा धक्का बसला आहे. लष्कराची ही कारवाई भविष्यातील घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांना रोखण्यासाठी एक ठोस पाऊल मानले जात आहे.
भारतीय सैन्याने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, देशाच्या अखंडतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियंत्रण रेषेवरील सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, आवश्यक असल्यास अशा कारवाया पुन्हा करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.