सध्या भारत आणि कॅनडा या दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हत्येचा कट भारताने रचला होता, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कटूता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदुतांची अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.
त्यानंतर कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कॅनडातील 'सिख फॉर जस्टिस' या संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू याने भारतीयांना धमकी दिली असून कॅनडा सोडण्यास सांगितलं आहे.
पन्नू याचा भारतीयांना धमकी देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना, भारत-हिंदू कॅनडा सोडा, भारतात जा. तुम्ही केवळ भारताचे समर्थन करत नाही, तर खलिस्तान समर्थक शिखांचं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचं समर्थन करत आहात, असं म्हणतान ऐकू येतय.
तो या व्हिडिओत म्हणतोय की, शहिद निज्जर यांच्या हत्येचा आनंद साजरा करुन तुम्ही हिंसेचं समर्थन करत आहात. २९ ऑक्टोबर रोजी व्हँकुव्हर येथे झालेल्या तथाकथित सार्वमतामध्ये मतदान करण्याचं आवाहन देखील त्याने कॅनडियन शिखांना केलं. त्याने या व्हिडिओत खलिस्तान समर्थक शिखांचंही कौतुक केलं असून ते नेहमी एकनिष्ठ राहिले आहेत आणि त्यांनी देशाचे कायदे आणि संविधानाचं समर्थन केलं आहे. भारताने SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांना दहशतवादी घोषित केलं आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या विधानानंतर काही तासांनी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी खलिस्तानी नेता हरदीप सिंहच्या हत्येमध्ये नवी दिल्लीच्या एजंट्सचा सहभाग असल्याचा आरोप लावला होता आणि कॅनडाच्या गुप्तजर संस्था सक्रिय असल्याचं म्हटलं होतं. भारताने मात्र ट्रूडो यांचा दावा ताबडतोब फेटाळला होता.