व्हेनेझुएलात मृत्यू झालेल्या ३३ वर्षीय भारतीय खलाशी राकेश चौहान यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात करण्यात आलेल्या दुसऱ्या शवविच्छेदनात त्यांच्या शरीरातील मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत आणि मूत्रपिंडांसह अनेक महत्त्वाचे अंतर्गत अवयव गायब असल्याचा धक्कादायक दावा फेडरेशन ऑफ सीफेअर्स युनियन्स ऑफ इंडिया (FSUI) ने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
महिनाभरानंतर पार्थिव भारतात
उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी असलेल्या राकेश चौहान यांचा व्हेनेझुएलात मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर जवळपास महिनाभराने त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात आले. मात्र, त्यासोबत मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा शवविच्छेदन अहवाल किंवा व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती, असा आरोप एफएसयूआयने केला आहे.
दुसऱ्या शवविच्छेदनात धक्कादायक बाब उघड
कुटुंबीयांच्या आग्रहानंतर भारतात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात शरीरातील अनेक महत्त्वाचे अंतर्गत अवयव गायब असल्याचे समोर आले. संघटनेच्या म्हणण्यानुसार, मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंडे, प्लीहा, स्वादुपिंड, पोट, आतडी, थायरॉइड ग्रंथी, हायॉइड हाड, स्वरयंत्र आणि श्वासनलिका हे अवयव गायब होते.
अहवालात मानेपासून जननेंद्रियापर्यंत मोठ्या प्रमाणात टाके असल्याचे तसेच एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत चिरा असल्याचे नमूद करण्यात आले असून, यावरून यापूर्वी शवविच्छेदन झाल्याचे संकेत मिळत असल्याचे सांगण्यात आले.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
भारतातील शवविच्छेदनात मृत्यूपूर्वी झालेल्या कोणत्याही गंभीर जखमा आढळल्या नाहीत. मात्र, तपासासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे अवयव उपलब्ध नसल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण निश्चित करता आले नसल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.
शिपिंग कंपनीवर विरोधाभासी माहिती दिल्याचा आरोप
राकेश चौहान यांच्या कुटुंबीयांनी शिपिंग कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीला चौहान जहाजावरून पडल्याने जखमी झाल्याचे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना वाचण्याची शक्यता केवळ पाच टक्के असल्याची माहिती देण्यात आली आणि काही तासांतच त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला कळवण्यात आली.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले तर, एफएसयूआयच्या दाव्यानुसार सुरुवातीला मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात नेमकं सत्य काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पार्थिवावर आधीच शवविच्छेदन झाल्याचा संशय
देवरियात पार्थिव आल्यानंतर शरीरावरील मोठ्या प्रमाणातील टाक्यांमुळे डॉक्टरांनी आधीच शवविच्छेदन झाल्याचा संशय व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर दुसरे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यात महत्त्वाचे अवयव गायब असल्याची बाब समोर आली.
राकेश चौहान यांच्या वडिलांनी, "आधीच शवविच्छेदन झाले होते, याची आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. दुसऱ्या शवविच्छेदनात अवयव गायब असल्याचे समोर आले. आम्हाला न्याय हवा असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी," अशी मागणी केली.
एफएसयूआयच्या प्रमुख मागण्या
एफएसयूआयने व्हेनेझुएलातील अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्याची, भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करण्याची, मूळ शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची तसेच चौहान यांच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, काही प्रकरणांमध्ये शवविच्छेदनासाठी तपासणीच्या उद्देशाने काही अवयव काढले जातात. मात्र, या प्रकरणात अवयव काढण्यामागील कारण, मूळ शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यूचे नेमके कारण याबाबत व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांकडून किंवा संबंधित शिपिंग कंपनीकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे राकेश चौहान यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांसह एफएसयूआयने निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी पुन्हा एकदा केली आहे.