तवांग : अरुणाचल प्रदेशातील दुर्गम हिमालयाच्या पर्वतराजीत तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना माल वाहतुकीसाठी स्वदेशी बनावटीची 'मोनोरेल' तयार करण्यात आली आहे. ही मोनोरेल बर्फाने वेढलेल्या अत्यंत धोकादायक रस्त्यावरून माल पुरवठ्याचे काम वेगाने करण्यास मदत करणार आहे.
अरुणाचल प्रदेशात १६ हजार फूट उंचीवर हिमालयाच्या पर्वतराजीत डोळ्यात तेल घालून भारतीय सैनिक सीमेचे संरक्षण करत असतात. या उंचीवर तैनात सैनिकांसाठी माल वाहतूक करणे कठीण काम असते. भारतीय लष्कराच्या 'गजराज' कोअर या विभागाने ही स्वदेशी मोनोरेल प्रणाली कार्यान्वित केली. ही यंत्रणा प्रयोगशाळेत नाही तर थेट सैनिकांची गरज लक्षात घेऊन विकसित केली आहे.
ही प्रणाली अति उंचावरील प्रदेशातील सैनिकांना भेडसावणाऱ्या कठीण आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे संकल्पित, विकसित आणि तैनात करण्यात आली आहे. बर्फवृष्टी, कठीण भूभाग आणि अचानक बदलणारे हवामानामुळे पुरवठा मार्ग खंडित झाले तरीही पुढील चौक्यांना आवश्यक सामग्री सतत मिळत राहील, असे संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी म्हटले.
हिमालयातील निर्जन भागात उंच कडे आणि मोठी उंची यामुळे आवश्यक पुरवठा मार्गात अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळे वर्षभर सैनिकांना सहाय्य मिळावे यासाठी एका नवीन आणि व्यवहार्य संकल्पनेची गरज होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
लेफ्टनंट कर्नल रावत यांनी म्हणाले की, ही 'मोनोरेल' मिशनसाठी आवश्यक असलेली सामग्री दारुगोळा, अन्नधान्य, इंधन, अभियांत्रिकी साधने आणि इतर जड किंवा विचित्र आकाराचे साहित्य सुरळीतपणे पोहचवू शकते. ही मोनो रेल दिवस-रात्र कार्यरत राहू शकते आणि गारपीट, वादळ किंवा कोणत्याही हवामानात, तसेच कोणत्याही एस्कॉर्टशिवायही सतत चालू राहते.
पुरवठा वाहतुकीव्यतिरिक्त, या मोनो रेलने तातडीच्या प्रसंगी जखमी सैनिकांच्या जलद स्थलांतरातही मदत करण्याची क्षमता दाखवली आहे. हेलिकॉप्टर उतरू न शकणाऱ्या किंवा चालण्यासाठी धोकादायक असलेल्या या भागात एक सुरक्षित पर्याय ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
'गजराज' कोरच्या नावीन्यपूर्णता आणि अनुकूलतेचे प्रतीक म्हणून या प्रयत्नाचे वर्णन करताना लेफ्टनंट कर्नल रावत म्हणाले की, या मोनोरेलमुळे लष्कराची ऑपरेशनल तयारी सुधारली आहे. तसेच एकाकी चौक्यांना अधिक बळकटी देऊ शकते. देशातील अत्यंत कठीण भूभागातही व्यवहार्य व मिशन-केंद्रित उपाय विकसित करण्यावर लष्कराचा भर असल्याचे दर्शवते.
३०० किलो वजन वाहण्याची शक्यता
ही मोनो रेल प्रणाली एका फेरीत ३०० किलोपेक्षा अधिक वजन वाहू शकते. ज्यामुळे इतर कोणताही पुरवठा किंवा दळणवळणाचा मार्ग नसलेल्या दुर्गम चौक्यांसाठी ती एक विश्वासार्ह जीवनरेखा ठरते.