इंधन दरवाढीचा फटका! इंडिगोकडून आजपासून तिकिटांवर अधिभार; विमानप्रवास महागणार 
राष्ट्रीय

इंधन दरवाढीचा फटका! इंडिगोकडून आजपासून तिकिटांवर अधिभार; विमानप्रवास महागणार

विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विमान कंपनी इंडिगोने तिकिटांवर इंधन अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा अधिभार १४ मार्चपासून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे येत्या काळात विमान प्रवासाचे भाडे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mayuri Gawade

विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिगो’ कंपनीने १४ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या तिकिटांवर इंधन अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा अधिभार ४२५ रुपयांपासून २,३०० रुपयांपर्यंत असेल. या निर्णयामुळे विमान प्रवासाचे भाडे वाढणार आहे.

देशांतर्गत उड्डाणे आणि भारतीय उपखंडातील उड्डाणांसाठी ४२५ रुपयांचा इंधन अधिभार आकारला जाईल. मध्यपूर्वेतील उड्डाणांसाठी हा अधिभार ९०० रुपये असेल. दक्षिण-पूर्व आशिया, चीन, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील उड्डाणांसाठी १,८०० रुपयांचा अधिभार आकारण्यात येणार आहे, तर युरोपकडे जाणाऱ्या उड्डाणांसाठी हा अधिभार २,३०० रुपये असेल.

एटीएफ दरात मोठी वाढ

विमान उद्योग सध्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF)च्या दरातील अचानक वाढीचा सामना करत आहे. विमान कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात एटीएफचा वाटा जवळपास ४० टक्के आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (IATA) च्या Jet Fuel Price Monitorनुसार आशियातील जेट इंधनाच्या किमती मागील महिन्याच्या तुलनेत ८४.८ टक्क्यांनी, तर गेल्या वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत ८९.९ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मध्यपूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या खर्चावर होत आहे.

विमान कंपन्यांवर खर्चाचा वाढता दबाव

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, एटीएफ हा विमान कंपन्यांच्या खर्चातील महत्त्वाचा घटक आहे. इंधनाच्या किमतीत झालेल्या अचानक वाढीचा सर्व विमान कंपन्यांच्या खर्चावर मोठा परिणाम होत आहे. पूर्ण खर्च भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात मोठी वाढ करावी लागली असती; मात्र प्रवाशांवरील अतिरिक्त भार लक्षात घेऊन तुलनेने मर्यादित अधिभार लागू करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

एअर इंडियाकडूनही अधिभार

यापूर्वी एअर इंडिया समूहाने १० मार्चपासून इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली होती. तीन टप्प्यांत हा अधिभार लागू केला जात आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत आणि SAARC देशांसाठी बुकिंगवर ३९९ रुपयांचा अधिभार आकारला जात आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पश्चिम आशियात १० डॉलर, दक्षिण-पूर्व आशियासाठी ६० डॉलर आणि आफ्रिकेसाठी ९० डॉलर इतका अधिभार लागू करण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ मार्चपासून युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी प्रति तिकीट २०० डॉलरपर्यंत अधिभार लागू होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात फार ईस्ट देशांसाठीही अधिभार लागू केला जाणार आहे.

परदेशी विमान कंपन्याही तयारीत

फक्त भारतीय विमान कंपन्याच नव्हे तर अनेक परदेशी विमान कंपन्याही इंधन अधिभार लागू करण्याच्या तयारीत आहेत. एअरएशिया (AirAsia), एअर न्यूझीलंड (Air New Zealand), कॅथे पॅसिफिक (Cathay Pacific), फिनएअर (Finnair), हॉंगकॉंग एअरलाईन्स (Hong Kong Airlines), क्वांटस (Qantas), थाई एअरवेज (Thai Airways) आणि नॉर्स अटलांटिक एअरवेज (Norse Atlantic Airways) या कंपन्यांनीही अधिभार लागू केला आहे किंवा येत्या काही दिवसांत तो लागू करण्याची घोषणा केली आहे.

एटीएफ दरातील वाढ आणि वाढते ऑपरेशनल खर्च लक्षात घेता, येत्या उन्हाळी पर्यटन हंगामात विमान भाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट