नवी दिल्ली : सरकारने किरकोळ महागाईचे दर जाहीर केले. हा महागाईचा दर ५.१० टक्क्यांवर आलेला असला तरीही डाळींची महागाई २० टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. जानेवारी २०२४ मध्ये डाळी व त्याच्याशी संबंधित उत्पादनाचा महागाई दर १९.५४ टक्के आहे. जानेवारी २०२३ मध्ये डाळींचा महागाई दर ४.२७ टक्के होता.
तूरडाळ ३५.५२ टक्के महाग
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार खात्याच्या किंमत देखरेख विभागाच्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी २०२४ मध्ये तूरडाळीची सरासरी किंमत १४९.२७ रुपये प्रति किलो होती. वर्षभरापूर्वी १२ जानेवारी २०२३ रोजी तूरडाळीची किंमत ११०.१४ रुपये प्रति किलो होती. वर्षभरात तूरडाळीच्या सरासरी किमतीत ३५.५२ टक्के वाढ झाली. उडीद डाळ प्रति किलो १२३.०९ रुपये आहे. वर्षभरापूर्वी ती १०५.१ रुपये किलो होती. उदीड डाळीचे दर सरासरी १७.११ टक्क्याने वाढले आहेत.
मूग डाळ प्रति किलो ११६.४९ रुपयाने मिळत आहे. गेल्यावर्षी या तारखेला १०२.९५ रुपयाने डाळ मिळत होती. वर्षभरात मूग डाळीच्या दरात १३.१५ टक्के वाढ झाली. चणा डाळ वर्षभरापूर्वी ७०.५१ रुपयांना मिळत होती. आता ती ८२.९३ रुपये प्रति किलोने मिळत आहे. वर्षभरात चणा डाळीच्या दरात १४.७७ टक्के वाढ झाली.
डाळींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आयातीवर अवलंबून आहे. सरकारने तूरडाळ, मसूर व उडीद डाळीला ड्युटी फ्री आयातीचा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवला. ‘भारत डाळ’ या ब्रँडनेमने सरकारने ६० रुपये प्रति किलो चणाडाळ विकत आहे. तसेच तूरडाळ, मसूर व उडीद डाळीचा साठ्याची मर्यादा घटवली आहे.
भारताने मोझॅम्बिक या देशातून डाळ आयातीचा करार केला आहे. पण, मोझॅम्बिकमध्ये दोन व्यापाऱ्यांमध्ये आपापसातील वादामुळे डाळीच्या आयातीला फटका बसला. त्यामुळे तूरडाळ आयात करण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी भारतात तूरडाळीच्या दरात वाढ होत आहे.