सुरत : महात्मा गांधींबद्दल इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह आणि अयोग्य रील पोस्ट केल्याप्रकरणी सुरत सायबर क्राईम पोलिसांनी ४७ वर्षीय महिलेला अटक केली आहे. संबंधित महिला इंस्टाग्रामवर लोकप्रिय असून तिचे सुमारे १० लाख फॉलोअर्स आहेत.
सुरत सायबर क्राईम शाखेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेची ओळख सिमरन पटेल अशी पटली असून ती सुरतच्या अदाजान परिसरातील रहिवासी आहे.
प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने १ ऑक्टोबर रोजी तिच्या इंस्टाग्रामवर एक रील अपलोड केली. यात ५०० रुपयांच्या नोटेवरील महात्मा गांधींच्या प्रतिमेचा वापर चुकीच्या आणि आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये अपमानास्पद वक्तव्ये करण्यात आली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाल्यानंतर एका जागरुक नागरिकाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर कारवाई झाली.