बंगळुरू : जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. सुरुवातीचा काळ सोडला तर दिवाळीनंतर मत्स्य दुष्काळाला सुरुवात होत असल्याची ओरड अनेकदा मच्छिमार करत असतात. पण आता मच्छिमारांच्या मदतीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ धावून आली असून त्यांनी बनवलेली जीपीएस यंत्रणा बोटीत बसवली, तर मासे नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत ते स्थान अचूकपणे दाखवले जाणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना आता जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासोळी गावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, “नवी जीपीएस यंत्रणा कमालीची असून यामुळे मच्छिमारांच्या इंधनाची बचत करण्यास मदत होते. त्याचबरोबर या जीपीएस यंत्रणेमुळे मच्छिमारांना आतापर्यंत चांगलाच आर्थिक लाभ झाला आहे. ही यंत्रणा बोटींना अचूक लोकेशन दाखवते, त्यामुळे पाकिस्तान किंवा अन्य राष्ट्रांची सीमा ओलांडण्यापासूनही वाचवते.”
“देशातील मच्छिमारांनी आता आपल्या जहाजात स्वदेशी जीपीएस यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली आहे. या यंत्रणेमुळे मच्छिमारांना मासळी पकडण्यासाठीची योग्य जागा सहजपणे मिळवून दिली जाते. यापूर्वी काही बोटी माशांविनाच किनाऱ्यावर परतत होत्या. मात्र, आता उपग्रहाच्या मदतीने, प्रत्येक दिवशी माशांच्या प्रत्यक्ष ठिकाणाबाबतची माहिती त्यांना उपलब्ध होत आहे. याचा मोठा फायदा मच्छिमारांना होत आहे,” असेही नारायणन यांनी सांगितले.
तमिळनाडूत आतापर्यंत १ हजारपेक्षा जास्त मच्छिमारांनी या जीपीएस यंत्रणेचा लाभ घेतला आहे. आता ही यंत्रणा किती प्रभावी आहे, हे त्यांना लवकरच समजेल.
इंधनाची बचत होणार
मासळी मिळण्याचे अचूक ठिकाण माहिती पडत असल्यामुळे बोटींना समुद्रात फिरावे लागत नाही. परिणामी, त्यांच्या इंधनाची मोठी बचत होत आहे. लवकरात लवकर बऱ्यापैकी मासळी जाळ्यात अडकत असल्यामुळे मच्छिमारांच्या कमाईत भर पडत आहे. या जीपीएस यंत्रणेमुळे मच्छिमारांना वर्षाला ३० हजार कोटी रुपयांचा फायदा होण्याचा अंदाज आहे, असेही नारायणन म्हणाले.