बंगळुरू : भारताला चंद्रापर्यंत नेणाऱ्या, मंगळ मोहीम यशस्वी करणाऱ्या, इस्रोमध्ये शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यांची लाट आली असून सरकारची चिंता वाढली आहे.
आतापर्यंत १०० ते १२० शास्त्रज्ञांनी इस्रो सोडले आहे. यातील ८० जण युआर राव सॅटेलाइट सेंटरचे कर्मचारी आहेत, तर विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या किमान २० शास्त्रज्ञांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बरेच शास्त्रज्ञ भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान अंतराळ मोहिमेवर काम करत होते.
दरम्यान, यामुळे सरकारी प्रशासनातील आंतरिक्ष विभागाला नवा आदेश काढावा लागला आहे. त्यानुसार गगनयान आणि अन्य महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांशी संबंधित 'ग्रुप ए'च्या शास्त्रज्ञांचे राजीनामे किंवा व्हीआरएस आता सामान्य प्रशासकीय प्रक्रिया समजले जाणार नाहीत. आता कोणत्याही सेंटरच्या संचालकांना त्यांच्या पातळीवर राजीनामा मंजूर करता येणार नाही. राजीनाम्याचा प्रत्येक अर्ज थेट आंतरिक्ष विभागाकडे पाठवला जाईल आणि तेथेच अंतिम निर्णय होईल.
स्टार्टअपमधील पॅकेजचे आकर्षण
देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेत राजीनाम्यांचा सपाटा का सुरू झाला आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतात खासगी अंतराळ स्टार्टअप्सची संख्या वेगाने वाढत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचा या ठिकाणी उत्तम संधी आणि चांगलं पॅकेज मिळत आहे. अंतराळ मोहिमांचा दबाव आणि गेल्या काही महिन्यांमध्ये बसलेल्या झटक्यांमुळे (उदाहरणार्थ पीएसएलव्ही मोहिमेचे अपयश) शास्त्रज्ञांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे इस्रोमधून ब्रेन ड्रेन सुरू झाले आहे. अनेक प्रतिभा संपन्न शास्त्रज्ञ इस्रोतून बाहेर पडत आहेत.