ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनीही ट्विटरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जॅक डोर्सी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताचे पराग अग्रवाल हे नवीन सीईओ बनले आहेत. या राजीनाम्यानंतर जॅक डोर्सीचे ट्विटरसोबतचे नाते पूर्णपणे संपुष्टात आले आहे.
गेल्या वर्षी सीईओ पदावरून पायउतार झाल्यानंतर कंपनीने जॅक डोर्सी यांचा कार्यकाळ संपेपर्यंत संचालकपदावर राहण्याची आणि २०२२ च्या समभागधारकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा केली होती. डोर्सीने ट्विटर बोर्ड सोडल्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा व्यवहार जाहीर केला आहे. अद्याप या करारावर शिक्कामोर्तब झाले नाही.
इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील करार सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. कंपनीकडून बनावट वापरकर्त्यांबाबत चुकीची माहिती दिल्याने हा संपूर्ण करार थांबवण्यात आल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले होते. यानंतर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी काही ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे मस्क यांच्यावर निशाणा साधला.
यानंतर ट्विटरने काही ट्विटद्वारे इलॉन मस्क यांच्यावर कंपनीसोबतचा नॉन-डिस्क्लोजर करार मोडल्याचा आरोप केला आहे.