राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात आज (दि. १४) दुपारी एक भीषण अपघात घडला. जैसलमेरहून जोधपूरकडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. बसमध्ये ५७ प्रवासी होते. या भीषण आगीत १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. १६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ मुले आणि ४ महिलांचाही समावेश असल्याचे समजते.
संपूर्ण बस आगीच्या विळख्यात
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. जैसलमेरहून बस सुटल्यावर काही अंतरावरच बसच्या मागील भागाला अचानक आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. बसच्या पुढील भागातील प्रवाशांनी तत्काळ बाहेर उड्या मारून जीव वाचवला, मात्र मागील सीटवर बसलेले प्रवासी अडकल्याचे समजते.
आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे अधिकारी कृष्णपाल सिंह राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बस जवळपास पूर्णपणे जळाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केले आणि अनेक जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना जवाहर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर अवस्थेतील प्रवाशांना जोधपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
या अपघातात अनेक प्रवाशांचे चेहरे, हात-पाय गंभीररित्या भाजले आहेत. काहीजणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. सहाय्यक अग्निशमन अधिकारी राठोड यांनी सांगितले की, दल घटनास्थळी पोहोचले तेव्हा १० ते १२ प्रवासी बसमध्ये अडकलेले होते. त्यांना बाहेर काढेपर्यंत बस जळून खाक झाली होती.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
प्राथमिक तपासानुसार, बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, आगीचे अचूक कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.