जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; मशिदीत लपलेला दहशतवादी लतीफ भटचा खात्मा  (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; मशिदीत लपलेला दहशतवादी लतीफ भटचा खात्मा

Lateef Bhat Encounter : भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने त्याला वारंवार आत्मसमर्पण करण्यास सांगितले. सुरक्षा दलाचे जवान त्याच्या मदतीसाठीच असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी (दि. १८) सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट याचा खात्मा केला. सीआरपीएफच्या चौकीवरील हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या लतीफ भटने सुरक्षा दलांनी घेरल्यानंतर एका मशिदीत लपला होता. त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र त्याने नकार दिल्यानंतर झालेल्या चकमकीत तो ठार झाला. या मोहिमेत जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफचे जवान सहभागी होते.

माहितीनुसार, कुलगाममध्ये सोमवारी (दि.१६) झालेल्या चकमकीनंतर लतीफ भटचा शोध सुरू होता. व्यापक शोधमोहीम राबवल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला घेरले. या मोहिमेत जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते.

या कारवाईनंतर सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, "अभिनंदन मित्रांनो. काही पदार्थ थंडच चांगले लागतात, अगदी कडाक्याच्या थंडीतही", अशी उपरोधिक टिप्पणी केली.

आत्मसमर्पणाचे आवाहन, मात्र लतीफ भटचा नकार

बुधवारी (दि. १८) सकाळी सुरक्षा दलांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लतीफ भटशी संपर्क साधला होता. त्याला शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दोन फोनच्या माध्यमातून हा संवाद सुरू असल्याचे दिसत आहे.

या संभाषणादरम्यान लतीफ भट कुराणातील आयतींचे पठण करत असल्याचे ऐकू येत होते. आत्मसमर्पण करण्याऐवजी मृत्यू स्वीकारण्याची तयारी त्याने दर्शवली. भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने त्याला वारंवार आत्मसमर्पण करण्यास सांगितले. सुरक्षा दलाचे जवान त्याच्या मदतीसाठीच असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र, लतीफने त्यांचे आवाहन धुडकावून लावले.

सीआरपीएफ चौकीवरील हल्ल्याचा तपास

लतीफ भट सोमवारपासून सुरक्षा दलांना चकवा देत होता. त्या दिवशी कुलगाममधील लारू परिसरात सुरक्षा दलांनी लतीफ भट आणि उमर निसार दार या दोघांना रोखले होते. यावेळी झालेल्या गोळीबारात उमर निसार दार ठार झाला. मात्र, जखमी अवस्थेतही लतीफ भट पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या हल्ल्याच्या तपासादरम्यान या दोघांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. हल्ल्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी लतीफ भट आणि उमर निसार दार यांनी कुलगाममधील विविध ठिकाणांची पाहणी केल्याचा संशय आहे. मीर बाजार, अखरान, हब्लिश आणि किलम या परिसरांत दोघे फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी या परिसरांची रेकी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलांचे तीन जवान जखमी झाले होते.

तपासात उमर निसार दार याने लतीफ भटला पाच ते सहा महिने आश्रय दिल्याची माहितीही समोर आली. त्याला आवश्यक साधनसामग्री आणि इतर मदत पुरवल्याचा संशय आहे. दरम्यान, उमर निसार दार बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कुलगाम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासातून त्याच्या हालचाली आणि लतीफ भटशी असलेल्या संबंधांबाबत माहिती उघड झाली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

बंगालच्या उपसागरात तिसरे वादळ; ताशी १२० ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

SpiceJet Flight Delay : मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा संताप अनावर; १२ तासांपासून खोळंबा - VIDEOS

मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी होणार; व्हॉट्सॲप, गुगल मेसेजचा आधार, ११ लाख मालमत्ताधारकांना वर्षातून चार वेळा संदेश

पालघरला स्वतंत्र जिल्हा न्यायालयाचा मार्ग मोकळा!