दिल्लीतील कार बॉम्बस्फोटानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्याचा विस्तार जम्मू–काश्मीरपर्यंत पोहोचला आहे. युनिव्हर्सिटीवर झालेल्या छाप्यांनंतर आता माध्यम क्षेत्रावरही कारवाईची मालिका सुरू झाली आहे. जम्मूमधील प्रसिद्ध व जुने वृत्तपत्र Kashmir Times च्या कार्यालयावर राज्य तपास यंत्रणा (SIA) ने गुरुवारी (दि. २०) मोठी छापेमारी केली. या छाप्यात एके ४७ रायफलची काडतुसे, पिस्तूलाचे राउंड्स आणि तीन हँड ग्रेनेड पिन्स जप्त करण्यात आल्या आहेत.
SIA च्या प्राथमिक तपासात Kashmir Times आणि त्यांचे प्रमोटर्स यांच्यावर भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच आधारे SIA ने एफआयआर नोंदवून चौकशी सुरू केली असून या एफआयआरमध्ये वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांचे नावही समाविष्ट आहे.
अधिकार्यांची चौकशी होण्याची शक्यता
ही कारवाई ११ तासांहून अधिक काळ चालली. छापेमारीदरम्यान SIA च्या विशेष पथकांनी कार्यालयातील फाइल्स, डिजिटल दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि कम्प्युटर्सची सखोल तपासणी केली. जप्त सामग्रीचा संबंध कोणत्या कथित देशविरोधी नेटवर्कशी आहे का, याचा तपास सुरू असून पुढील काही दिवसांत वृत्तपत्राच्या प्रमोटर्स आणि संबंधित वरिष्ठ अधिकार्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
१७५४ साली स्थापना
Kashmir Times ची स्थापना १९५४ साली ज्येष्ठ पत्रकार वेद भसीन यांनी केली होती. त्यांच्या निधनानंतर मुलगी अनुराधा भसीन आणि जावई प्रबोध जमवाल यांनी संपादकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळली. १९६४ मध्ये साप्ताहिकातून दैनिकात रूपांतरित झालेले हे वृत्तपत्र जम्मू–काश्मीरमधील प्रमुख माध्यमसंस्थांपैकी एक मानले जाते.
या छापेमारीमुळे जम्मू–काश्मीरच्या राजकीय, सुरक्षा आणि माध्यम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.