मुंबई : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या ३०,२१३ कोटी रुपयांच्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंगला (आयपीओ) अँकर अॅलोकेशनसह एकूण सुमारे ७४,६१० कोटी रुपयांची मागणी मिळाली. बुधवार रोजी उघडल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांत संपूर्ण सबस्क्रिप्शन पूर्ण करून हा भारताच्या इतिहासातील सर्वात जलद आयपीओ ठरला आहे.
एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा सार्वजनिक इश्यू ३.०१ पट सबस्क्राइब झाला होता, ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी १९.७५ कोटी शेअर्सच्या तुलनेत ५९.४४ कोटी शेअर्ससाठी बोली लावली.
१,११९ रुपयांच्या प्राईस बँडच्या उच्च टप्प्यानुसार मोजल्यास, सार्वजनिक बोली सुमारे ६६,५०० कोटी रुपयांच्या होत्या, तर अँकर अॅलोकेशनमुळे एकूण मागणीत आणखी ८,११० कोटी रुपयांची भर पडली.
क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायेर्ससाठी राखीव कोटा ९.०२ पट सबस्क्राइब झाला. ४.९० कोटी शेअर्सच्या तुलनेत ४४.२२ कोटी शेअर्ससाठी बोली लागली. यामध्ये बँका आणि विमा कंपन्यांसह देशांतर्गत वित्तीय संस्थांनी २५.०२ कोटी शेअर्ससाठी, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १५.१४ कोटी शेअर्ससाठी बोली लावली. म्युच्युअल फंड्सनी ३.१९ कोटी शेअर्ससाठी मागणी नोंदवली. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांची मागणी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या शेअर्सच्या १.५८ पट पोहोचली.
बाजारात दुसऱ्या दिवशीही घसरण
ऊर्जा, बँक, वित्त कंपन्यांच्या शेअर्समधील विक्री तसेच तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाल्यामुळे बुधवारी प्रमुख निर्देशांकांची घसरण सलग दुसऱ्या सत्रातही सुरूच राहिली. परिणामी सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरला. तर निफ्टी निर्देशांकात ७७ अंक घसरण झाली.