राष्ट्रीय

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला एकीकडे दणदणीत विजय मिळालेला असतानाच, दुसरीकडे झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडीने निर्विवाद विजय प्राप्त केला आहे.

Swapnil S

रांची : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला एकीकडे दणदणीत विजय मिळालेला असतानाच, दुसरीकडे झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडीने निर्विवाद विजय प्राप्त केला आहे. झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांपैकी ५५ जागांवर विजय मिळवत इंडिया आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला केवळ २५ जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना १ जागा मिळाली आहे.

झारखंडमध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या इंडिया आघाडीला ८१ पैकी ५५ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला ३४, काँग्रेसला १६, राजदला ४ आणि सीपीआयएमएल पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत, तर एनडीएला २५ जागा मिळाल्या असून, त्यामध्ये भाजपाला २१, एजेएसयू पक्षाला १, लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला १, जनता दल युनायटेड पक्षाला १ आणि जेएलकेएम पक्षाला १ जागा मिळाली आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. राज्यात आक्रमक प्रचार करणाऱ्या भाजपला २५ जागा मिळाल्या आहेत.

या विजयाबद्दल जनतेचे आभार मानताना हेमंत सोरेन म्हणाले की, आघाडीची कामगिरी म्हणजे आम्ही लोकशाहीची परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत, तर आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सहप्रभारी हिमंत सरमा यांनी झारखंडचा पराभव जिव्हारी लागणारा आहे, असे म्हटले आहे. आक्रमक प्रचारानंतर भाजपला झारखंडमध्ये सत्ता स्थापन करण्याबाबत विश्वास वाटत होता.

संथल परगणा प्रांतातून होणारी घुसखोरी यावर भाजपने प्रचारामध्ये भर दिला होता. मात्र जेएमएमने आदिवासींचा मुद्दा उपस्थित केला. त्यापुढे घुसखोरीचा मुद्दा निष्प्रभ ठरला. त्याचप्रमाणे सोरेन यांना करण्यात आलेल्या अटकेमुळेही सहानुभूतीचे वातावरण होते. त्यातच पक्षांतर करून आलेल्यांना भाजपने प्राधान्याने उमेदवारी दिल्याने पक्षात अंतर्गत धुसफूसही होतीच.

विक्रमी मतदानाचा सत्ताधारी झामुमोला लाभ

झारखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर यावेळी प्रथमच ६७.७४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. हे मतदान सत्ताधारी झामुमोसाठी लाभदायक ठरले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने ४३ जागा लढविल्या, तर काँग्रेसने ३० जागा लढविल्या. त्यामध्ये काँग्रेसला १६ जागांवर यश मिळाले. भाजपने ६८ जागा लढविल्या. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान १३ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० नोव्हेंबर रोजी झाले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?

निकालात दडलंय काय? हिंदुत्वाचे वर्चस्व