पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

कर्नाटकातील बागलकोटमध्ये पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेतील व्हिडिओ शूट करून नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार.

Mayuri Gawade

विवाहबाह्य संबंधाचा संशय घेऊन पत्नीची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात २९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत मृत्युशी झुंज देत असतानाच तिचा व्हिडीओ शूट करून तो नातेवाईक आणि मित्रांना पाठवल्याचाही आरोप पोलिसांनी केला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, मृत महिलेची ओळख भाग्यश्री जिगालूर अशी असून, सोमवारी (दि.२७) सायंकाळी बिलगी तालुक्यातील गलगली गावातील त्यांच्या घरात तिचा मृतदेह आढळला. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती प्रवीण जिगालूर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक तपासानुसार, प्रवीणला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा संशय होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. गेल्या दीड महिन्यापासून भाग्यश्री माहेरी राहत होती. सोमवारी आरोपी आपल्या सासरी गेला आणि पत्नीला परत घरी घेऊन आला. त्यानंतर घरात दोघेच असताना ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ पाठवल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत असताना आरोपीने तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ त्याने महिलेचे वडील, नातेवाईक आणि काही मित्रांना पाठवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधील तसेच महिलेच्या मोबाईलमधील काही व्हिडीओ जप्त केले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

हत्या की आत्महत्या? तपास सुरू

महिलेच्या शरीरावर रक्ताचे डाग आणि दुखापतीच्या खुणा आढळल्याने पोलिस विविध शक्यतांचा तपास करत आहेत. आधी मारहाण करून गळफास दिला की मारहाणीनंतर तिने स्वतःच गळफास घेतला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. घटनास्थळावरून लोखंडी रॉडसारखे हत्यार जप्त करण्यात आलं असून, न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

पोलिसांना घटनास्थळी बिअरच्या बाटल्याही आढळल्या आहेत. महिलेला मद्य किंवा अन्य गुंगीचं औषध देण्यात आलं होतं का, याचाही तपास सुरू आहे. शवविच्छेदनादरम्यान पोटातील नमुने जतन करून ते न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

चार वर्षांचा संसार, तीन वर्षांचा मुलगा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि भाग्यश्री यांचं २०२० मध्ये लग्न झालं होतं. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. चालक म्हणून काम करणारा प्रवीण वारंवार बाहेरगावी जात असल्याने, त्याच काळात पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा त्याला संशय आला होता, असा प्राथमिक तपासातून दावा करण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू

बागलकोटचे पोलिस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या व्हिडीओंची सत्यता, ते नेमके कधी चित्रीत करण्यात आले आणि घटनाक्रम काय होता, याचा तपास सुरू आहे. तसेच या दाम्पत्यातील वादांबाबत यापूर्वी ग्रामपंचायतीच्या बैठका झाल्या होत्या का, याचीही चौकशी केली जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली