बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षणप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. ट्रायल कोर्टाच्या आदेशाला कायम ठेवत येडियुरप्पा यांच्यावर खटला चालवण्यास आणि त्यांना समन्स बजावण्यास उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.
उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला निर्देश दिले आहेत की, येडियुरप्पा यांची व्यक्तिशः उपस्थिती आवश्यक असल्याशिवाय त्यावर आग्रह धरू नये. केवळ कार्यवाहीसाठी त्यांची उपस्थिती अत्यावश्यक असेल, तेव्हाच त्यांना हजर राहण्याची सक्ती करावी.
कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ट्रायल कोर्टाने या खटल्याचा निर्णय सुनावणीदरम्यान सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर घ्यावा आणि याच याचिकांवरील उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा त्यावर कोणताही प्रभाव पडू नये. याचिकाकर्त्यांना दोषमुक्तीच्या याचिकेसह सर्व परवानगीयोग्य अर्ज कनिष्ठ न्यायालयासमोर सादर करण्याची मुभा असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.