तिरुवनंतपुरम (पीटीआय) : केरळमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांचा पराभव झाला आहे. केरळमध्ये काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’ला १०२ जागा मिळाल्या आहेत. तर, डाव्या पक्षांच्या ‘एलडीएफ’ला ३५ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने केरळमध्ये प्रथमच तीन जागांवर विजय मिळवला आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस ६३, सीपीएम २६, आययूएमएल २२, सीपीआय ८, केरळ काँग्रेस (एम) ४, तर भाजप, केरळ काँग्रेस (केईसी) आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी) यांनी प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळवला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’ने सत्ता काबीज केली आहे. डाव्या पक्षांच्या ‘एलडीएफ’चा यावेळी पराभव झाला आहे.
केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलले जाते. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्त्वात ‘एलडीएफ’ने विजय मिळवला होता. यावेळी मात्र काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’ने सत्ता मिळवली आहे.
केरळमध्ये भाजपने खाते खोलले
केरळमध्ये भाजपने प्रथमच खाते खोलले आहे. डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या चथन्नूर मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. २०२१ मध्ये चथन्नूर विधानसभा मतदारसंघात डाव्या पक्षाने १७ हजार मतांनी विजय मिळवला होता. भाजपचे उमेदवार बीबी गोपकुमार यांनी डाव्या पक्षांचे उमेदवार अॅड. आर. राजेंद्रन यांचा ४३९८ मतांनी पराभव केला आहे. याशिवाय भाजपचे उमेदवार नेमोम आणि कझकोट्टम विधानसभा मतदारसंघातूनही विजयी झाले आहेत.
केरळमध्ये ‘एलडीएफ’चे १२ मंत्री पराभूत
केरळ विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील एलडीएफचे किमान १२ मंत्री पराभूत झाले आहेत. पराभूत असलेल्या मंत्र्यांमध्ये वीणा जॉर्ज, एम. बी. राजेश, ओ. आर. केळू, आर. बिंदू, जे. चिंचुराणी, पी. राजीव, के. बी. गणेश कुमार, व्ही. एन. वासवन, व्ही. शिवनकुट्टी, व्ही. अब्दुरहिमन, ए. के. ससींद्रन आणि रोशी ऑगस्टीन यांचा समावेश आहे.
केरळमध्ये सतीशन यांच्या रूपाने नवे नेतृत्व
'यूडीएफ'च्या या विजयामुळे केरळच्या राजकारणात के. करुणाकरन आणि उम्मेन चंडी यांसारख्या नेत्यांशिवाय एक नवीन पिढी पुढे येत असून त्याचे नेतृत्व व्ही. डी. सतीशन करत आहेत. याशिवाय, केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे तीन आमदार 'एनडीए'चे प्रतिनिधित्व करणार आहेत.
धर्मदाममधून पिनराई विजयन विजयी
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी धर्मदाम विधानसभा मतदारसंघातून ८५,६१४ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे अब्दुल राशीद आणि भाजपचे के. रणजित यांचा पराभव केला. २०२१ च्या निवडणुकीत विजयन यांनी ९५,५२२ मते मिळवून ५९.८ टक्के मतांची आघाडी घेतली होती. त्यावेळी 'एलडीएफ'ने १४० पैकी ९९ जागा जिंकत सत्ता राखली होती आणि 'सीपीएम'ने ६२ जागा जिंकल्या होत्या.