भुवनेश्वर : ओडिशातील १३व्या शतकातील कोणार्क मंदिराच्या गर्भगृहात आता भाविकांना प्रवेश करता येणार आहे. इंग्रजांनी सुमारे १९०३-०४ साली मंदिराच्या गर्भगृहात भरलेली हजारो टन वाळू काढण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व विभाग आणि आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांच्या ३० लोकांच्या टीमला ही वाळू काढण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
मंदिराच्या मागे असलेली १५ फूटांची भिंत कोसळू नये, यासाठी इंग्रजांनी मंदिराच्या गर्भगृहात वाळू भरली होती. त्यामुळे तब्बल १२२ वर्षांपासून मंदिराच्या गर्भगृहात कुणालाही जाता आलेले नाही. एएसआय पुरी सर्कलचे अधीक्षक डीबी गडनायक यांनी सांगितले की, “गर्भगृहातील पूर्ण वाळू काढण्यासाठी साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागेल. नियोजनानुसार ही कामगिरी फत्ते झाल्यास, एक वर्षानंतर भाविकांना पहिल्यांदाच या ऐतिहासिक मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करता येईल.”
आतील भिंतींची सद्यस्थिती काय आहे? गर्भगृहाचा सांगाडा (ढाचा) कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी १२७ फूट उंच असलेल्या या मंदिरात ८० फूट उंचीवर शून्य कंपनसह ड्रिलिंग केले जात आहे. ड्रिल करून ८.५ मीटर लांब आणि १६० मिमि. रूंद दगड आणि आत भरलेल्या वाळूचा नमुना काढून तो आयआयटी मद्रासला पाठवण्यात आला आहे. पाठवलेल्या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर गर्भगृहातून वैज्ञानिक पद्धतीने वाळू काढली जाईल आणि त्यानंतर मंदिराची पुनर्रचना केली जाईल. वाळू काढल्यानंतर जेव्हा गर्भगृह रिकामे होईल, तेव्हा सांगाडा (ढाचा) पुन्हा पूर्वीसारखा बनवला जाईल, जसा तो बांधकामाच्या वेळी होता.
भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षण सहायक त्रैलोक्यनाथ बेहरे यांनी सांगितले की, “मंदिर पुढील हजार वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठीच आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. गर्भगृहात भेगा, उतार आणि असंतुलन आढळले. हे मंदिर धोक्यात असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. आयआयटी मद्रासच्या अहवालानुसार, जर गर्भगृहातून एकाच वेळी वाळू काढली असती, तर मंदिराचे दगड सरकण्याचा आणि भेगा वाढण्याचा धोका होता. त्यामुळे प्रत्येक वेळी वाळू काढताना दगडांना आधार दिला जाईल. एका छोट्या चुकीमुळे मंदिराचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे खूप सावधगिरी बाळगावी लागत आहे. काही दगडांमध्ये सूक्ष्म भेगादेखील आढळल्या. म्हणून आम्ही वाळू काढण्यापूर्वी मंदिराच्या संरचनेला बळकटी देण्याचे ठरवले आहे.”
दरवर्षी ३५ लाखांहून अधिक पर्यटकांची भेट
या मंदिरात दरवर्षी ३५ लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. देशातील भारतीय पुरातत्व विभागाच्या स्मारकांमध्ये ताजमहालनंतर हे मंदिर दुसऱ्या स्थानावर आहे. हे मंदिर १३व्या शतकात राजा नरसिंह देव (प्रथम) यांनी १२ वर्षांत बांधले होते. हे मंदिर सूर्य उपासनेसोबतच सागरी शक्तीचे प्रतीक आहे. मंदिराच्या बाहेरील भागात खोंडालाइट आणि गर्भगृहाच्या आत लॅटराइट दगड वापरला आहे. यापैकी एक दगड जड तर दुसरा हलका असतो. मंदिर बांधल्यानंतर काही वर्षांनी गर्भगृहाचा एक भाग कोसळला होता.