नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (९६) यांना शनिवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर देखरेख करीत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे रुग्णालयातून सांगण्यात आले.
ऑगस्ट महिन्यातदेखील अडवाणी यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना अचानक रुग्णालयात का दाखल करण्यात आले, याबद्दल अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. अडवाणी यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातदेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जुलैमध्ये त्यांना एम्स रुग्णालयात, तर ऑगस्ट महिन्यात अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून लालकृष्ण अडवाणी यांना आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागत आहे.