कानपूर: पाच वर्षांच्या चिमुकल्यामुळं कानपूरमध्ये दारूचे दुकान बंद होणार आहेत. कानपूरमध्ये शाळांशेजारल दारूच्या दुकानांचे परवाने नुतनीकरण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एलकेजी शाळेच्या विद्यार्थ्याने या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर शाळेच्या शेजारीच दारूचे दुकान असेल, तर त्याचा परवाना दरवर्षी वाढवलाच पाहीजे, असं नाही.
कंत्राटी परवान्याच्या मुदतवाढीवर बंदी -
कानपूरच्या आझाद नगरमधील सेठ एमआर जयपुरिया शाळेच्या शेजारी असलेल्या दारूविक्रीचा परवाना २५ मार्चनंतर वाढवण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. मुख्य न्यायमूर्ती अरुण भन्साळी आणि न्यायमूर्ती विकास यांच्या खंडपीठाने बुधवारी ५ वर्षीय विद्यार्थी मास्टर अथर्वने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला आहे. एलकेजी विद्यार्थ्याने शाळेपासून २० फूट अंतरावर असलेली दारूची दुकाने हटवण्याची मागणी करत वडिलांमार्फत जनहित याचिका दाखल केली होती.
मद्यपींच्या गोंधळामुळं शाळकरी मुले हैराण झाली होती-
याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, सरकारी आदेशाचे उल्लंघन करून दररोज शाळेच्या शेजारील दारुच्या दुकानात येणाऱ्या मद्यपींच्या गोंधळामुळे अडचण होत आहे. त्यानंतर शाळेला लागून असलेल्या दारूच्या दुकानाच्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण कसे केले जाते, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यावर शाळा होण्यापूर्वीपासूनच येथे दारुचे दुकान असल्याचे सरकारनं सांगितलं आणि काही तरतुदींचा हवाला दिला. त्यावर न्यायालयानं सांगितलं की, मुदत संपल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण करणे गरजेचं नाही. दुकानाचा परवाना 31 मार्च 25 पर्यंत आहे, त्यानंतर तो वाढवू नये, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
नियमानुसार शाळेशेजारी दारुच्या दुकानाला मिळत नाही परवाना-
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कानपूर शहरातील प्राणीसंग्रहालयाजवळ असलेल्या आझाद नगर भागातील आहे. पाच वर्षांचा अथर्व दीक्षित हा आझाद नगर भागात असलेल्या सेठ एमआर जयपूरिया शाळेचा एलकेजीचा विद्यार्थी आहे. शाळेपासून अवघ्या 20 मीटर अंतरावर दारूचे दुकान आहे. नियमानुसार शाळेजवळ दारू दुकानाचा परवाना देता येत नाही. यावर अथर्वच्या कुटुंबीयांनी त्याच्या नावाने अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, अनेकदा सकाळी 6 ते 7 या वेळेत येथे मद्यपींचा जमाव असतो. दारूच्या नशेत लोक येथे गोंधळ घालतात. शाळेजवळ एक रहिवासी भाग देखील आहे, जिथे शेकडो लोक राहतात.
अनेक कुटुंबांनीही तक्रारी केल्या आहेत-
अनेक कुटुंबीयांनी कानपूरच्या अधिकाऱ्यांकडे आणि सरकारकडे अनेकदा तक्रारी केल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही. ही शाळा 2019 मध्ये सुरू करण्यात आली, तर दारूचा ठेका जवळपास 30 वर्षे जुना असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.