नवी दिल्ली : ‘लार्सन ॲॅण्ड टुब्रो’ या बहुराष्ट्रीय कंपनीचे प्रमुख एस. एन. सुब्रमण्यम यांनी भारतात दर आठवड्याला ९० तास काम करण्याची सूचना केल्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारतीय खरोखरीच किती तास काम करतात. जागतिक कामगार संघटनेनुसार, भारतीय लोक दर आठवड्याला ४७.८ तास काम करतात, तर अमेरिकेसारख्या विकसित देशातील कामगार आठवड्याला ३८ तास काम करत आहे. भारतीय कामगारांना दर आठवड्याला सरासरी ५० डॉलर्स (८०० रुपये) वेतन मिळते. तर अमेरिकेत कामगारांना दर आठवड्याला ८६ हजार रुपये वेतन मिळते. म्हणजेच, भारतात भरपूर काम असूनही कमी पगार मिळतो, तर अमेरिकेत कमी काम असूनही चांगला पगार कामगारांना दिला जातो.
जागतिक कामगार संघटनेच्या माहितीनुसार, जास्त तास काम करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होतो. भारतीय लोक दर आठवड्याला ४७.८ तास काम करतात तर ५१ टक्के भारतीय ४९ तासांपेक्षा अधिक काम करतात.
जगात सर्वाधिक कामाचे तास हे भूतानमध्ये आहेत. भूतानमध्ये ६१ टक्के कामगार आठवड्याला ४९ तास काम करतात. बांगलादेशातील ४७ टक्के व पाकिस्तानातील ४० टक्के कामगार ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात.
कमी तास काम करणारे देश
वनुआतु देशात आठवड्यात २४.७ तास, किरिबातीत २७.३ तास, मायक्रोनेशिया ३०.४ तास, रवांडा ३०.४ तास व सोमालियात ३१.४ तास काम केले जाते.
‘ब्रिक्स’मधील कामाचे तास
ब्राझीलमध्ये आठवड्याला ३९ तास, रशियात ३९.२ तास, चीनमध्ये ४६.१ तास, दक्षिण आफ्रिकेत ४२.६ तास काम करण्यात येते. ‘ब्रिक्स’ देशात सर्वात जास्त कामगारांचे कामाचे तास केवळ भारतात आहेत.